TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळाच्या जीआरवर रोहिणी खडसेंचे सरकारला ५ सवाल; ‘शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर टीका; कर्जमाफी, हेक्टरी ५० हजारांची मदत आणि DBTबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी

जळगाव : महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध सवलती आणि उपाययोजना जाहीर केल्या असतानाच, या शासन निर्णयावरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दुष्काळाच्या जीआरवर प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत किती आणि कधी मिळणार, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या निर्णयावर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुष्काळ जाहीर करताना विविध अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती लाभ मिळणार, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘कर्ज पुनर्गठन म्हणजे कर्जमाफी नाही’

दुष्काळाच्या जीआरमधील तरतुदींवर आक्षेप घेताना रोहिणी खडसे यांनी कर्ज पुनर्गठनाचा उल्लेख म्हणजे प्रत्यक्ष कर्जमाफी नव्हे, असा मुद्दा उपस्थित केला. तसेच कृषी पंपांच्या वीजबिलातील सवलत ही संपूर्ण दिलासा देणारी नसल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांकडून हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी होत असताना जीआरमध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारने दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी कर्ज पुनर्गठन, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, जमीन महसुलात सवलत, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामांसाठी शिथिलता, पाणीटंचाईच्या ठिकाणी टँकर, अन्नधान्य व चाऱ्याची व्यवस्था अशा उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पीक नुकसानीवरील प्रत्यक्ष आर्थिक मदतीचा निर्णय आवश्यक मूल्यांकन आणि पंचनाम्यांनंतर स्वतंत्रपणे घेतला जाणार असल्याचे अधिकृत माहितीत नमूद आहे.

हेही वाचा –  दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्ली दरबारी; अमित शाहांची घेतली भेट, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

रोहिणी खडसेंचे सरकारला ५ सवाल

रोहिणी खडसे यांनी सरकारकडे पुढील प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत :

२६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणार?

मदतीसाठी शासनाकडून किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे?

शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTद्वारे रक्कम कधी जमा होणार?

‘Trigger-2’चे मूल्यांकन कधी पूर्ण केले जाणार?

प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?

रोहिणी खडसे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीचा उल्लेख करत सरकारने परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याची मागणीही केली. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, तसेच विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क माफ न करता संपूर्ण वर्षाची फी माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता पंचनामे, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष आर्थिक मदतीच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group