Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; २९ ऑगस्टपासून पुन्हा तीव्र आंदोलनाची घोषणा

अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस; ‘मागण्या मान्य न झाल्यास अंतरवाली सराटीतून आंदोलनाला सुरुवात’, जरांगेंचा सरकारला इशारा

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस असून, मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

जरांगे यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होण्याचे आवाहन केले. “ज्यांनी अर्ज दिले आहेत पण ते स्वीकारले गेले नाहीत, तसेच ज्यांची कुणबी नोंद सापडली असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवालीमध्ये यावे,” असे आवाहन त्यांनी केले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजात उदासीनता असल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाने घरात बसून न राहता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

“आपल्यातला आळस आणि मरगळ झटकून टाका. मुलांचं वाटोळं करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२९ ऑगस्टच्या आंदोलनात एकही गोष्ट मागे ठेवणार नाही

सरकारकडून संध्याकाळपर्यंत काय निर्णय घेतला जातो, हे पाहू; मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे जरांगे यांनी सांगितले. २९ ऑगस्टच्या आंदोलनात एकही मुद्दा मागे ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करून प्रलंबित अर्ज आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.

हेही वाचा –  साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रणासाठी मोठे पाऊल; Zepto, Blinkit, Swiggy Instamartवर खरेदीला मर्यादा

नोंदींची संख्या कमी करण्याचा प्रयत्नअसा आरोप

मराठा समाजाच्या कुणबी नोंदींबाबत जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. “आम्ही ५८ लाख नोंदी शोधल्या आहेत. या नोंदींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि इतर मंत्र्यांना सावध राहण्याचा इशारा दिला. मराठा समाजाला योग्य शासन निर्णय (GR) देण्याची मागणी करत, अन्यथा सत्ताधाऱ्यांना त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटले.

मुंबईतही आंदोलन होणार

२९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत संभ्रम नसल्याचे स्पष्ट करत जरांगे यांनी सुरुवातीचे आंदोलन अंतरवाली सराटी येथेच होणार असल्याचे सांगितले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील टप्प्यात मुंबईत आंदोलन करण्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अल्टिमेटमची मुदत संपत असताना सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि २९ ऑगस्टच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button