राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला बदनाम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राजकीय वळण देऊन भाजप नकारात्मक राजकारण करत आहे’; COEP वसतिगृहातील राड्यावरून पुण्यात राजकीय वातावरण तापले

पुणे : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला बदनाम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. COEP वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राजकीय वळण देऊन भाजप नकारात्मक राजकारण करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (COEP) वसतिगृहात मध्यरात्री काँग्रेस-NSUI आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. ‘नकारात्मक प्रचार करण्यात भाजप माहीर आहे,’ असा आरोप करत पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम राहुल गांधी यांच्या विरोधात रचलेले कटकारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राजकीय रंग दिल्याचा आरोप
राहुल गांधी हे पुण्यात तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच इतर समस्या जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, राहुल गांधींच्या दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्थानिक प्रश्नाला राजकीय वळण देऊन राहुल गांधींचा नकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे शिंदे म्हणाल्या.
वसतिगृहातील अनाथ ओबीसी विद्यार्थिनीच्या मुलाखतीवरून आणि त्यानंतर झालेल्या माफीनाम्यावरून सुरू असलेल्या वादाचाही त्यांनी उल्लेख केला. सामान्य विद्यार्थ्यांच्या समस्यांना चुकीचे वळण देऊन संस्थात्मक दबावाचा वापर करत राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे
दरम्यान, COEP वसतिगृहातील मध्यरात्रीच्या राड्यानंतर पुणे पोलिसांनी दोन्ही विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी आणि उपलब्ध व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून, कॅम्पसमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काँग्रेसने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यावर राजकीय दबावापोटी अन्याय होऊ नये, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.





