शाळांच्या आधुनिकीकरणासाठी एकनाथ शिंदेंचा ‘मिशन मोड’; शिक्षण विभागाला कालबद्ध कृती आराखड्याचे निर्देश
दादा भुसे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चार तास बैठक; शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि गुणवत्तावाढीवर भर

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाला मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी नंदनवन या निवासस्थानी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन त्यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत शिक्षण विभागाच्या चांगल्या योजना आणि उपक्रम पोहोचवण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. शाळांचे आधुनिकीकरण करताना विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा आणि भविष्यातील संधी लक्षात घेण्यावर त्यांनी भर दिला.
“आपल्या मुलांच्या आकांक्षा आणि स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था निर्माण केली पाहिजे,” असे शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
हेही वाचा – वारंवार चॉकलेट, चिप्स किंवा गोड पदार्थ खावेसे वाटतात? शरीर देत असू शकते ‘या’ पोषक घटकांची कमतरता
शिक्षक प्रशिक्षण आणि गुणवत्तावाढीवर भर
प्रस्तावित कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्याबरोबरच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा योग्य सन्मान करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.
दर आठवड्याला प्रगतीचा आढावा
कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. कामातील अडचणी तातडीने दूर करून योजनांना गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अभिजीत दिपकेंच्या ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेचीही चर्चा
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी राज्यातील शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ मोहीम सुरू केली आहे. विविध शाळांना भेट देत तेथील पायाभूत सुविधांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागावर टीका केली होती. काही ठिकाणी शाळांमध्ये सुविधांचा अभाव असल्याचा दावा करत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाची घेतलेली चार तासांची बैठक आणि शाळांच्या आधुनिकीकरणासाठी दिलेले निर्देश महत्त्वाचे मानले जात आहेत.





