कोल्हापुरात MD ड्रग्जच्या कारखान्यावर मोठी कारवाई; 100 कोटींचे 50 किलो MD जप्त
चंदगडच्या हाजगोळी येथे महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची कारवाई; सहा जण ताब्यात, ड्रग्ज निर्मितीचे साहित्य आणि रसायनेही जप्त

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे MD ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पुणे पथकाने छापा टाकला. या कारवाईत अंदाजे १०० कोटी रुपये किमतीचे ५० किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईदरम्यान MD तयार करण्यासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य आणि विविध रसायनेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
सीमावर्ती भागात सुरू होता ड्रग्ज निर्मितीचा कारखाना
चंदगड तालुक्यातील हाजगोळी या ग्रामीण आणि सीमावर्ती भागात MD ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. कारखान्यात MD तयार करण्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान विविध कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, ड्रिलसदृश मशीन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या कारखान्यामागे नेमके कोण आहेत आणि या ड्रग्जच्या निर्मिती व वितरणामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास अंमली पदार्थविरोधी पथकाकडून सुरू आहे.
हेही वाचा – ‘पुणे म्हणजे प्रेम’; राहुल गांधींच्या मराठीतील दोन शब्दांनी ‘जेन झी’चा जल्लोष
ड्रग्ज निर्मितीच्या मुळावर घाव घालण्याचे सरकारचे धोरण
दरम्यान, ड्रग्जविरोधी कारवायांना सरकारचे विशेष प्राधान्य असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले आहे. ड्रग्जची विक्री होणारी ठिकाणे शोधून कारवाई करण्यासोबतच ड्रग्जची निर्मिती करणारी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री स्तरावरही ड्रग्जविरोधी कारवायांचा आढावा घेण्यात आला आहे. ड्रग्जच्या मुळावर घाव घालण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.
दरम्यान, हाजगोळी येथील MD ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तपासातून या प्रकरणातील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.





