कोयना जलसागरात समाधानकारक पाणीसाठा; पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केले जलपूजन
सिंचनासह वीज निर्मितीचा प्रश्न मिटणार; सातारा आणि सांगली जिल्ह्याला होणार मोठा लाभ

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलाशयातील पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले.
कोयना जलसागर परिसरात आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जलसागरातील पाण्याचे विधिवत पूजन करून ओटी भरली. यावेळी बोलताना त्यांनी कोयना जलसागराचे महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्व अधोरेखित केले.
हेही वाचा – कोल्हापुरात MD ड्रग्जच्या कारखान्यावर मोठी कारवाई; 100 कोटींचे 50 किलो MD जप्त
“छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये आणि संपन्नतेमध्ये या धरणाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे,” असे देसाई यांनी सांगितले.
सध्या धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचनासह वीज निर्मितीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या पाणीसाठ्याचा लाभ सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यालाही होणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.





