‘पुणे म्हणजे प्रेम’; राहुल गांधींच्या मराठीतील दोन शब्दांनी ‘जेन झी’चा जल्लोष
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद; ‘महिला शक्ती हीच भारताची सर्वात मोठी ताकद’ म्हणत मनुस्मृतीवर टीका

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम शनिवारी (२२ ऑगस्ट) पुण्यात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी ‘जेन झी’ पिढीशी संवाद साधत महिला सक्षमीकरण, समाजव्यवस्था आणि देशाच्या भवितव्यावर भाष्य केले. महाराष्ट्रासह देशभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झाले होते.
यावेळी राहुल गांधी यांनी भारताची सर्वात मोठी ताकद महिला असल्याचे सांगितले. “७० कोटी भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. महिला शक्ती हीच देशाची ताकद आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
भारतीय समाजात महिलांकडे प्रामुख्याने मुलगी, पत्नी किंवा आई या भूमिकांमधून पाहिले जाते. या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी महिलेची ओळख केवळ यापुरती मर्यादित राहू नये, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
“महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असतात. भारतातील महिला हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे. मात्र, महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आई म्हणून पाहिले जाते. महिलेची ओळख यापुरतीच मर्यादित असू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – अभिजीत दिपके यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
यावेळी राहुल गांधी यांनी मनुस्मृतीच्या विचारसरणीवरही टीका केली. मनुस्मृतीने महिलांना तीन चौकटींमध्ये बसवले असून महिलांनी स्वतंत्र राहू नये, असा त्यामागील विचार असल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमात अनेक विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. काही विद्यार्थिनींनी व्यासपीठावर जाऊन आपल्या समस्या आणि आलेले अनुभव त्यांच्यासमोर मांडले. राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी राहुल गांधी यांनी पुणेकर आणि जेन झीसाठी मराठीतून खास संदेश दिला. पुण्यासाठी खास संदेश काय द्याल, असा प्रश्न निवेदकाने विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी अवघ्या दोन शब्दांत उत्तर दिले—“पुणे म्हणजे प्रेम.”
राहुल गांधी यांच्या या मराठी वाक्यानंतर कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला. उपस्थित विद्यार्थिनींनीही “पुणे म्हणजे प्रेम” असा नारा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा शेवट राहुल गांधी यांच्या या खास मराठी संदेशाने झाला.





