TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’! ठाकरे गटासह काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील म्हणाले, ‘जे चुकले त्यांना धडा शिकवू’

कळंब : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर वेगळेच वळण मिळाले असून कळंब नगर परिषदेत ‘ऑपरेशन लोटस’ पार पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या स्वीकृत नगरसेवकासह तब्बल १० नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या ९, तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेत विरोधी पक्षातील एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मोहसीन मिर्झा हे भाजपमध्ये प्रवेश न केलेले एकमेव नगरसेवक ठरले आहेत. मात्र, परभणीतील ड्रग्ज प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा –  PCMCL सोसायटीधारकांना पुन्हा भुर्दंड; प्रक्रिया केलेल्या पाण्यावर महापालिकेचे शुल्क!

या पक्षांतरामुळे कळंबच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात जाण्याची चर्चा असलेले नगरसेवक थेट भाजपमध्ये गेल्याने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना राजकीय धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर आमदार कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना सावध करत प्रतिक्रिया दिली. “चुकांमधून धडा घेऊ आणि जे चुकले त्यांना धडा शिकवू,” असा इशारा त्यांनी दिला.

संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील राजकीय लढा उभारू आणि सर्वसामान्यांचा आवाज बनू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट पुढील काळात कोणती राजकीय रणनीती आखणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button