महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस; जिल्हा संघटकांना लॅपटॉपचे वितरण
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लॅपटॉप सुपूर्द; ऑक्टोबरमध्ये बारामतीत होणार प्रतिष्ठित भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा

पुणे : बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वितरण उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा आणि क्रीडा मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कारप्राप्त जनार्दन शेळके, अर्जुन पुरस्कारप्राप्त सुरेखा कुलकर्णी आणि श्रीरंग इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
‘पेपरलेस कामकाज ही काळाची गरज’
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज झाली आहे. लॅपटॉपच्या माध्यमातून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कामकाजाला पेपरलेस स्वरूप देण्यास सुरुवात होईल.
स्वर्गीय अजितदादांनी खो-खो खेळाच्या चौफेर प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरणाचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – चाकण-तळेगाव महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर
ऑक्टोबरमध्ये बारामतीत खो-खो स्पर्धा
कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि महत्त्वाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
यंदाची स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात बारामती येथे होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने असोसिएशनने आतापासूनच तयारीला सुरुवात करावी, अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
२३ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे लॅपटॉप सुपूर्द
यावेळी असोसिएशनअंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.




