‘ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा’; मंत्री छगन भुजबळ
पात्र लाभार्थ्यांना मोफत सहाय्यभूत साधनांचे वाटप; एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश

नाशिक : राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ, सुरक्षित व स्वावलंबी करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील माऊली लॉन्स येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ बोलत होते. कार्यक्रमाला कृषी बाजार समितीचे सभापती वसंत पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार विविध सहाय्यभूत साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये कानाचे मशीन, चालण्यासाठी काठी व कुबड्या, चष्मा, व्हीलचेअर, वॉकर, कॉमर्ड चेअर, इलेक्ट्रिक सायकल तसेच अन्य आवश्यक साधनांचा समावेश आहे.
हेही वाचा – परभणीत १,६२२ कोटींची गुंतवणूक; १५ हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती
वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि स्वावलंबी करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ६० वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह लाभ घ्यावा. नवीन लाभार्थ्यांनीही आवश्यक कागदपत्रांसह नावनोंदणी करावी, जेणेकरून विविध शिबिरांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना साहित्याचा लाभ देता येईल, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुलभता, सुरक्षितता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे. वयोमानानुसार निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी एकही पात्र लाभार्थी आवश्यक सहाय्यभूत साधनांपासून वंचित राहू नये, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री योजना आणि एडिप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कानाचे मशीन, ब्रेल लिपी किट, स्मार्ट मोबाईल, चालण्यासाठी काठी व कुबड्या, चष्मा, व्हीलचेअर, वॉकर, इलेक्ट्रिक सायकल, कॉमर्ड चेअर आणि संवादासाठी विशेष उपकरणांचा समावेश होता.
दरम्यान, दिव्यांगांना सेवा-सुविधा मिळण्यासाठी नाशिक येथे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर करण्यात आल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.





