Nobel Prize 2026: रसायनशास्त्रातील नोबेल हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना; शतकभराचे रासायनिक कोडे सोडवले
‘नॉन-लिनिअर इफेक्ट्स’ आणि ‘ऑटोकॅटालिसिस’मधील संशोधनासाठी सर्वोच्च सन्मान; औषधनिर्मितीसाठीही संशोधन महत्त्वाचे

मुंबई : जगभरातील प्रतिष्ठेच्या Nobel Prize 2026 पुरस्कारांची घोषणा सुरू असून, बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. फ्रान्सचे शास्त्रज्ञ हेन्री बी. कागन (Henri B. Kagan) आणि जपानचे शास्त्रज्ञ केन्सो सोई (Kenso Soai) यांना संयुक्तपणे २०२६ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘असममित सेंद्रिय संश्लेषणातील नॉन-लिनिअर परिणाम आणि स्व-उत्प्रेरणाचा शोध’ यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दोन्ही शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे रासायनिक प्रक्रियेत एखाद्या रेणूच्या दोन आरशातील प्रतिबिंबांसारख्या रूपांपैकी एकाचे प्राबल्य कसे निर्माण होऊ शकते, हे समजून घेण्यास मदत झाली. सजीवांच्या शरीरात आढळणाऱ्या अनेक रेणूंमध्ये अशीच ‘होमोचिरॅलिटी’ (Homochirality) दिसून येते. या प्रक्रियेचे रहस्य रसायनशास्त्रज्ञांसाठी दीर्घकाळापासून एक महत्त्वाचे कोडे होते.
१०० वर्षांहून जुने रासायनिक कोडे उलगडले
नोबेल समितीच्या मते, कागन आणि सोई यांच्या संशोधनाने रासायनिक अभिक्रियांमध्ये एका विशिष्ट ‘मिरर-इमेज’ रेणूची निर्मिती कशी वाढवता येते, याचा मार्ग स्पष्ट केला. १९८६ मध्ये कागन यांनी एका विशिष्ट आरशातील रेणूचे प्रमाण वाढविण्याची शक्यता दाखवून दिली. त्यानंतर सोई यांनी या संशोधनाला पुढे नेत १९९५ मध्ये अशा अभिक्रियेची रचना केली आणि २००३ मध्ये एका विशिष्ट आरशातील रूपाच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले.
नोबेल समितीचे अध्यक्ष हेनर लिंके यांनी हा शोध शतकाहून अधिक काळापासून असलेल्या रासायनिक रहस्याच्या उकलशी संबंधित असल्याचे सांगितले.
हेही वाचा – गोकुळ निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होणार? धनंजय महाडिकांचा मोठा दावा; ‘९० टक्के ठराव आमच्याकडे’
औषधनिर्मितीसाठी संशोधन महत्त्वाचे
या संशोधनाचा उपयोग केवळ सैद्धांतिक रसायनशास्त्रापुरता मर्यादित नसून औषधनिर्मिती आणि जैविकदृष्ट्या सक्रिय रेणू तयार करण्यासाठीही त्याचे महत्त्व आहे. एखाद्या औषधाच्या रेणूची दोन आरशातील रूपे असू शकतात आणि त्यांचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अपेक्षित परिणाम देणारे विशिष्ट रूप तयार करण्याची क्षमता औषधनिर्मितीत अत्यंत महत्त्वाची ठरते.
कागन आणि सोई कोण आहेत?
हेन्री बी. कागन हे फ्रान्समधील ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ असून ते Université Paris-Sud शी संबंधित आहेत. असममित संश्लेषण आणि असममित उत्प्रेरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जातात. केन्सो सोई हे जपानचे शास्त्रज्ञ असून ते Tokyo University of Science शी संबंधित आहेत.
यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची रक्कम १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर असून ती दोन्ही विजेत्यांमध्ये समान वाटली जाणार आहे. पुरस्कार सोहळा १० डिसेंबर २०२६ रोजी स्टॉकहोममध्ये होणार आहे.
Nobel Prize 2026 चे पुढील वेळापत्रक
२०२६ च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा ५ ऑक्टोबरपासून सुरू झाली. वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर बुधवारी रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर झाला. आता साहित्याचा नोबेल पुरस्कार गुरुवारी, शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी, तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर केला जाणार आहे.




