ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

उद्धव-राज ‘युती ‘बाबत संभ्रम!

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा यशस्वी, मनोमीलन तर झाले, पण राज ठाकरे म्हणतात, 'वेट अँड वॉच' !

मुंबई : मराठी भाषा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे एका व्यासपीठावर आले खरे, त्यांचे मनोमीलन झाले, असे म्हणणाऱ्यांना आता मात्र धक्का बसला आहे. उद्धव हे लवकरात लवकर ‘युती’ व्हावी याबाबत आग्रही आहेत तर राज ठाकरे मात्र ‘ठंडा करके खाओ’ किंवा ‘वेट अँड वॉच’ भूमिकेमध्ये गेले आहेत.

ठाकरे बंधू वीस वर्षांनी एकत्र !

त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले. ठाकरे बंधूंचा मेळावा दि. ५ जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा झाला. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र, राज ठाकरेंनी ‘युती’ बाबत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

मेळाव्याबाबत संजय उवाच..

उबाठा गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, पाच तारखेला जो मराठी भाषेचा विजयोत्सव झाला, त्याबाबत जनता अद्यापही चर्चा करत आहे. महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेल्या वीस वर्षांपासून वाट पाहत होती आणि तो क्षण आल्यावर आता जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी, अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात.

सांस्कृतिक मंत्री..संयमी भाष्य अपेक्षित !

राऊत म्हणाले, की काहीजण ठाकरेंवर दबाव आणू पाहत आहेत का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही, एका विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र विजय दिवसाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीने अशी विधाने करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केले पाहिजे.

पहेलगाम अतिरेक्यांशी तुलना चुकीची..

पहलगाम हल्ल्याच्या अतिरेक्यांशी तुलना करणे, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असे विधान करणे, त्यांना अतिरेकी ठरवणे, हे चित्र काय सांगत आहे? सरकार आणि मंत्र्यांना ठाकरे बंधू एकत्र आलेले नको आहेत. त्यांना मराठी भाषा या राज्यांमध्ये अभिमानाने झळकलेली नको, त्यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा, असे वाटत नाही आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना पहलगामच्या अतिरेक्यांशी करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी आशिष शेलार यांच्यावर केला.

राज ठाकरे यांनाच विचारा..

राज ठाकरेंकडून ‘युती’ बाबतचे कुठलेही संकेत व्यक्त करण्यात आले नाहीत. तर उद्धव ठाकरे हे राजकीय युतीसाठी जास्त आग्रही आहेत, अशी चर्चा आता रंगली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तुम्ही राज ठाकरे यांनाच विचारा. आमच्याकडून आम्ही सातत्याने मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे, तो कायम आहे. मराठी माणसाच्या मनातील भावना किंवा जो संताप आहे, त्या संतापाला वाट करून देण्याचे काम सुद्धा आम्ही करतो.

हेही वाचा – राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश

काँग्रेस मराठी प्रश्नापासून दूर..

आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे राज आणि उद्धव एकत्र आले तर ‘महाविकास आघाडी’ चे अस्तित्व काय असणार ? काँग्रेसने आतापासूनच स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस मराठीच्या विजयी मेळाव्यापासून दूर राहिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? याची चर्चा राजकीय नेत्यांमध्ये मात्र सुरू आहे.

‘युती’बाबत न बोलण्याचे आदेश..

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या ‘युती: संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार !

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले. पण, भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिला नाही. त्यामुळे ‘युती’ साठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी मनसे आणि उबाठागटाची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, त्याबद्दल सर्वत्र कमालीची उत्सुकता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group