Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्रात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; आणखी ६०० पदांसाठी भरती प्रक्रिया

२५० दंतचिकित्सकही आरोग्य सेवेत दाखल होणार; ‘जन आरोग्य संवाद’च्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच आणखी ६०० डॉक्टरांच्या पदांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून, भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.

आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टर रुग्णांशी योग्य संवाद साधतात का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती या संवादातून घेण्यात आली.

स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य व्यवस्था केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे, असे आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि समस्या नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाणार आहे.

हेही वाचा –  ‘ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा’; मंत्री छगन भुजबळ

स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार, सकस आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही निर्माण करण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची सूचना केली. तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्याची सूचना त्यांनी केली. या सूचनांना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’ या संकल्पनेत नागरिकांचा थेट सहभाग वाढवून आरोग्य सेवांमधील अडचणी दूर करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा प्रयत्न राहील, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस, दौलत दरोडा, किसन कथोरे, विनोद निकोले यांच्यासह विविध आमदार, नगराध्यक्ष, आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button