परभणीत १,६२२ कोटींची गुंतवणूक; १५ हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती
गुंतवणूक परिषदेत १६२ उद्योजकांसोबत सामंजस्य करार; ‘इंटिग्रेटेड सीबीजी क्लस्टर’सह उद्योगभवन उभारण्याचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा निर्धार

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यात विविध उद्योगांच्या माध्यमातून १ हजार ६२२ कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून, या गुंतवणुकीतून १५ हजार ६१७ स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित ‘इन्व्हेस्ट इन परभणी’ गुंतवणूक परिषदेत १६२ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. येत्या दसऱ्यापर्यंत संबंधित उद्योगांच्या इमारतींच्या बांधकामाची पायाभरणी करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
स्थानिक उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रे, वित्तपुरवठा, अनुदान आणि पात्रतेबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परभणीत नवीन उद्योगभवन उभारण्यात येणार असून, उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या एकाच खिडकीतून देण्यावर भर राहणार आहे. ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या माध्यमातून उद्योगांना चालना देऊन नियमित आढावा बैठका घेण्यात येतील, असे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
परभणीत महाराष्ट्रातील पहिला इंटिग्रेटेड सीबीजी क्लस्टर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कृषी अवशेष, प्रेसमड, नेपियर गवत, गोबर आणि जैविक कचऱ्यापासून सीबीजी व सेंद्रिय खतनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
हेही वाचा – साताऱ्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकर भरा; पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचना
याशिवाय ‘वेस्ट टू वेल्थ’ आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन कचऱ्याचे ऊर्जा, रोजगार आणि संपत्तीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परभणीला हरित ऊर्जा आणि वेस्ट टू वेल्थ उद्योगांचे प्रमुख केंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परिषदेत विविध उद्योजकांनी आगामी काळातील गुंतवणुकीची माहिती दिली. ई-कॉमर्स क्षेत्रात सुमारे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस सुनील घैसासी यांनी व्यक्त केला. धीरेन गिलानी यांनी फूड प्रोसेसिंग क्षेत्रात पुढील पाच वर्षांत सुमारे १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे सांगितले. यातून सुमारे १० हजार स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेसर्स पालवी अँग्री कंपनीचे नितीन इंगोले यांनी ई-कॉमर्स क्षेत्रात ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करण्याची माहिती दिली. शेळीपालन व्यवसायातही गुंतवणूक करून स्थानिक युवकांना रोजगार देण्याचा मानस उद्योजक निलेश त्रिभुवन यांनी व्यक्त केला.
परभणीचे प्रमुख सामर्थ्य असलेल्या कृषी क्षेत्राला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. कृषी उत्पादन शेतातून कंपनीमार्फत जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोदामे, कोल्ड स्टोरेज, पर्यटन, युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी तसेच महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढविण्यावरही भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या परिषदेला खासदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, विविध शासकीय अधिकारी, उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेमुळे परभणीच्या औद्योगिक क्षमता, कृषीआधारित उद्योग, फूड प्रोसेसिंग, ई-कॉमर्स आणि रोजगारनिर्मितीच्या संधींना व्यापक व्यासपीठ मिळाल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली.





