साताऱ्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकर भरा; पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचना
स्मार्ट पीएचसीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; क्रीडा संकुलातील कामांचाही घेतला आढावा

सातारा : आरोग्य विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या मंजुरीनुसार तातडीने कार्यवाही करून रिक्त पदे भरावीत, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आरोग्य अभियानाच्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला.
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) प्रलंबित कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले. नियोजन विभागाकडून स्मार्ट पीएचसीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च करावा. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे अद्याप अपूर्ण असल्यास ती तातडीने पूर्ण करावीत, असे देसाई यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी जुन्या आरोग्य केंद्रांच्या इमारती निर्लेखित करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे, ती तातडीने पूर्ण करावी. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जेदार नवीन इमारती उभारण्याची कामे पूर्ण करूनच नवीन निधीची मागणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खालीपे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठकही घेण्यात आली. क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यासह प्रलंबित असलेली विविध कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जलतरण तलावाची थकीत रक्कम वसूल करण्यास मंजुरी देण्यात आली.





