मुंबईत गणेशोत्सव मंडपासाठी ऑनलाइन ‘एक खिडकी’ परवानगी; खड्डा खोदल्यास २ हजारांचा दंड
पालिकेच्या संकेतस्थळावर मंडप परवानगीची सुविधा; यंदाही अनामत रक्कम केवळ १०० रुपये

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाही ऑनलाइन ‘एक खिडकी’ प्रणाली सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी देण्यासाठी संगणकीय कार्यप्रणाली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मुंबईत सुमारे १० ते ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी सुमारे दोन ते तीन हजार मंडळे रस्त्यावर किंवा पदपथावर मंडप उभारतात. अशा मंडळांना पालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. ही प्रक्रिया एकाच खिडकीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर महापालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे काँक्रीट केलेले रस्ते कोणत्याही कारणास्तव खोदण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; आणखी ६०० पदांसाठी भरती प्रक्रिया
गणेशोत्सव मंडप उभारताना रस्ते किंवा पदपथावर खड्डे खोदल्यास यंदाही प्रति खड्डा २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड गेल्या वर्षीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला असून, त्यात यंदा कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदण्याऐवजी खड्डेविरहित मंडप उभारणीच्या तंत्राचा वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना केले आहे. मंडप उभारणीसाठी मूर्तिकार किंवा संबंधितांकडून रस्ते अथवा फूटपाथवर खड्डे करण्यात आल्यास त्यांच्यावरही प्रति खड्डा २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
मंडप परवानगीसाठी मंडळांना यंदा १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. पूर्वी ही रक्कम २० हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत असायची. मंडप उभारल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, तर त्याचा खर्च अनामत रकमेतून वसूल करण्याची पद्धत होती.
मात्र गेल्या वर्षी अनामत रक्कम कमी करून १०० रुपये करण्यात आली होती. यंदाही हीच रक्कम कायम ठेवण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या २०१७ मधील निर्णयानुसार रस्त्यावर खड्डे खोदल्यास प्रति खड्डा २ हजार रुपये दंड आकारला जातो. यंदाही त्याच नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





