नितेश राणेंचे ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ म्हणण्याचे आवाहन; राजकीय वातावरण तापले

नितेश राणेंचे ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ म्हणण्याचे आवाहन; राजकीय वातावरण तापले

ठाणे : मुंब्रा परिसरात आयोजित भव्य कावड यात्रेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्र्याचे नामांतर ‘मुंब्रादेवी’ करण्याची मागणी करणाऱ्या राणे यांनी आता नागरिकांनी ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ असा उल्लेख करावा, असे आवाहन केले आहे.

कावड यात्रेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, “बोलता बोलता आपण मुंब्र्यात आलो असे म्हणतो; पण हे मुंब्रा नाही, तर मुंब्रादेवी आहे. आजपासून कोणीही मुंब्रा म्हणू नका, मुंब्रादेवी म्हणा.” हा परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि उद्याही भगवाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या परिसरात हिंदू समाजाची ताकद अधिक वाढली पाहिजे, असेही राणे म्हणाले.

यावेळी राणे यांनी हिंदुत्व आणि राज्यातील सत्तेबाबतही भाष्य केले. “हा हिंदू महाराष्ट्र आहे आणि ही महादेवाची भूमी आहे. इथल्या हिंदू समाजाने कोणत्याही भीतीखाली राहू नये,” असे ते म्हणाले. हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री मंत्रालयात असल्याचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक हिंदू समाजाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा –  फक्त वजन कमी असणे म्हणजे फिटनेस नव्हे; निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयी ठेवा

कोणी नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, तर आपण एका तासात येथे पोहोचू, असेही राणे यांनी म्हटले. मुंब्रादेवी परिसरातील भगवा विचार कायम राहील, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, राणे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राणेंवर निशाणा साधला. राणे ज्या विभागाचे मंत्री आहेत, त्या विभागातील प्रश्नांवर त्यांनी लक्ष द्यावे, अशी टीका पवार यांनी केली.

कोकणातील रस्त्यांची अवस्था सुधारण्याऐवजी अशा विषयांवर वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी राणेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जसे आपण कपडे बदलतो, तसे त्यांनी भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकांवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल त्यांनी केला.

यापूर्वीही मुंब्रा परिसरातील राणेंच्या वक्तव्यांवरून राजकीय वाद निर्माण झाला होता. आता ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ म्हणण्याच्या नव्या आवाहनामुळे या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *