TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘दिमागी नक्षलवादी’ कोण? किरेन रिजिजूंकडून यादी स्पष्ट; काँग्रेसला प्रत्युत्तर

माओवाद्यांना पाठिंबा, संविधान नाकारणारे आणि फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा समावेश; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना ‘दिमागी नक्षल’ म्हटले नसल्याचा दावा

नवी दिल्ली : सशस्त्र नक्षलवादाविरोधातील लढाईला यश मिळाले असले, तरी देशात ‘दिमागी नक्षलवादी’ अर्थात वैचारिक नक्षलवादी प्रवृत्ती अद्याप अस्तित्वात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हटले होते. या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आल्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण देत ‘दिमागी नक्षलवादी’ म्हणजे नेमके कोण, याची यादीच स्पष्ट केली.

रिजिजू यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना ‘दिमागी नक्षलवादी’ असे संबोधलेले नाही. हा शब्द अशा प्रवृत्तींसाठी वापरण्यात आला आहे, ज्या माओवादी विचारसरणीला समर्थन देतात, भारतीय संविधान नाकारतात किंवा देशाच्या एकता-अखंडतेविरोधात भूमिका घेतात.

रिजिजू यांच्या मते, माओवाद्यांना पाठिंबा देणारे आणि भारतीय संविधान नाकारणारे, फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहून कलम ३७० चे समर्थन करणारे तसेच ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागापासून वेगळे करण्यासाठी ‘चिकन नेक’ तोडण्याची भाषा करणारे लोक ‘दिमागी नक्षलवादी’ प्रवृत्तीमध्ये येतात.

हेही वाचा –  नितेश राणेंचे ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ म्हणण्याचे आवाहन; राजकीय वातावरण तापले

‘चिकन नेक’ म्हणून ओळखला जाणारा सिलिगुडी कॉरिडॉर हा ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा महत्त्वाचा भौगोलिक मार्ग आहे. या मार्गाबाबत देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारी भूमिका घेणाऱ्यांवरही रिजिजू यांनी निशाणा साधला.

रिजिजू यांनी पुढे स्पष्ट केले की, सशस्त्र नक्षलवादाचे देशातून जवळपास उच्चाटन झाले आहे. मात्र, माओवादी विचारसरणीचा प्रभाव सार्वजनिक जीवनातील काही क्षेत्रे आणि संस्थांमध्ये अद्याप असल्याचा दावा त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनीही आपल्या भाषणात अशा वैचारिक प्रवृत्ती ओळखून त्यांना एकटे पाडण्याचे आवाहन केले होते. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारसरणीपासून तरुणांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

रिजिजू यांच्या या स्पष्टीकरणामुळे ‘दिमागी नक्षलवादी’ या शब्दावरून सुरू झालेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button