ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सप्तर्षी फाउंडेशनचे २०वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर संपन्न

पिंपरी-चिंचवड | दिव्यांग बालकांना मोफत उपचार, समुपदेशन आणि आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने २०वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर ९ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. या आरोग्य उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण झाली असून, आतापर्यंत शेकडो दिव्यांग बालक व त्यांच्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला आहे.

दिव्यांगत्व म्हणजे अपंगत्व नव्हे, तर वेगळ्या क्षमतेची ओळख आहे. योग्य उपचार, मार्गदर्शन आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्यास दिव्यांग बालके आत्मविश्वासाने व स्वावलंबी जीवन जगू शकतात, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात वैद्यकीय उपचारांसोबत पालकांचे समुपदेशन, आजाराविषयी माहिती, दीर्घकालीन उपचारांचे मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्यात आला.

या उपक्रमाची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ रोजी झाली. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमॅन यांच्या प्रेरणेतून हे शिबिर आयोजित केले जाते. डॉ. विजयकर यांनी २००५ मध्ये विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्प सुरू केला होता. त्यांची सेवा परंपरा पुढे नेण्यासाठी डॉ. रजत मालोकार यांनी विशेष पुढाकार घेतला.

शिबिराचे उद्घाटन डॉ. रजत मालोकार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे उपस्थित होते. त्यांनी सप्तर्षी फाउंडेशनच्या दिव्यांग बांधवांसाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले.

प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांग बालकांचे उपचार व समुपदेशन केले. यामध्ये डॉ. रजत मालोकार, डॉ. दीप्ती मालोकार, डॉ. शिवानी वासोया, डॉ. शीतल मकवाना, डॉ. मोहिनी सोनवणे, डॉ. रसिका वाडे, डॉ. सोनिया शिंदे, डॉ. सुधीर बुटके, डॉ. अक्षता प्रभू, डॉ. पूजा कलंत्री, डॉ. प्रतीक सोनवणे, डॉ. मोहिनी कडाव, डॉ. वृषाली, डॉ. अम्मातुला, डॉ. पंखुरी आणि डॉ. जय शहा यांचा समावेश होता.

२१ दिव्यांग बालकांचे विशेष आधार कार्ड शिबिर

आरोग्य शिबिरासोबतच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने विशेष आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २१ दिव्यांग बालकांनी सहभाग घेतला.

हेही वाचा

मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात

बौद्धिक दिव्यांगत्व, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी आणि बहुविकलांगत्व असलेल्या बालकांना आधार कार्डसाठी बायोमेट्रिक अपडेट करताना अनेक अडचणी येतात. डोळ्यांचे स्कॅनिंग किंवा बोटांचे ठसे घेताना स्थिर बसणे शक्य नसल्याने प्रक्रिया अनेकदा अपूर्ण राहते. ही समस्या लक्षात घेऊन सप्तर्षी फाउंडेशनकडून विशेष आधार शिबिर राबविण्यात येत आहे. आधार कार्ड ही विविध शासकीय व अशासकीय सेवांसाठी आवश्यक कागदपत्रे असल्याने दिव्यांग व्यक्तींना ही सुविधा सुलभतेने मिळावी, यासाठी संस्थेकडून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

दिव्यांगांसाठी ‘वन स्टॉप सोल्युशन’

कार्यक्रमात ‘दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन’ या संकल्पनेअंतर्गत ‘डीजीअबिलिटी’ पोर्टलच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. या पोर्टलद्वारे देशभरातील विविध शिबिरे व उपक्रमांची नोंदणी एका क्लिकवर करता येणार असून, दिव्यांगांसाठी आवश्यक शासकीय व खासगी सेवाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

लवकरच ‘डीजीअबिलिटी’ आणि ‘डीजीअबिलिटी कम्युनिटी’ हे दोन ॲप उपलब्ध करून देण्यात येणार असून, देशातील सुमारे पाच कोटी दिव्यांग बांधवांना विविध सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती नवसप्तर्षी इनोव्हेशन कंपनीचे संस्थापक मनोज बोरसे यांनी दिली.

शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोज बोरसे यांनी आभार मानले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनिकेत जगताप, वैष्णवी पाटील, समीक्षा मोरे, पुष्पक वंजारी, दीपक, दुर्गेश, टेकोन्सी सॉफ्टवेअरचे संस्थापक राहुल अहिरे यांच्यासह सतीश ढगे, मीनाक्षी ढगे, अंबिका कुलट, चंद्रिका सुतार, कुणाल पाटील, संतोष कांबळे, राजशेखर पाटील, विद्या पिल्ले, चिंतामणी जांभळे, मृण्मयी पाटील, पप्पू यादव, सुमित जाधव, वृषाली बोरसे आणि मनोज बोरसे यांनी परिश्रम घेतले.

शिबिरासाठी मीनाक्षी सतीश ढगे, पल्लवी पाटील, ॲड. विशाल जगदाळे, निसार मुलानी, दिलीप आवळे आणि योगेश पेटकर यांनी आर्थिक सहकार्य केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button