पेपरफुटी अन् शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेवर बाबा रामदेव आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली | देशातील शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था, वाढते पेपरफुटीचे प्रकार आणि सरकारी नोकरभरतीतील कथित गैरव्यवहारांवरून प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशात सर्वत्र गोंधळ उडाला असून शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. व्यवस्थेत वेळीच सुधारणा झाली नाही, तर मला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हरिद्वारमधील पतंजली योगपीठावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
बाबा रामदेव म्हणाले, परीक्षेत गैरकारभार वाढला आहे. विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा प्रामाणिकपणे दिल्यानंतर त्यांचे हक्काचे गुण त्यांना मिळत नाहीत. प्रवेश परीक्षांच्या आधारावरच पुढे चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळतो. सरकारी नोकरी मिळवताना ९० ते ९९ टक्के घोटाळे होत आहेत. आपले कुटुंब, आपली संघटना, आपली विचारधारा आणि आपल्याच जातसमूहातील लोकांना नोकरी मिळवून दिली जाते आणि बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडले जाते. हे खूपच अपमानास्पद असून ही बाब लोकशाही आणि न्यायाच्या विरोधात आहे.
हेही वाचा
बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करत घडवला नवा इतिहास
‘नाहीतर मला आंदोलन करावे लागेल’
परीक्षा पास होऊन जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ येते तेव्हा उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना भरती केले जाते. यावर आंदोलन करावे लागले. त्यामुळे वेळ असतानाच सुधरा. नाहीतर देशात आणखी आंदोलने होऊ शकतात. आंदोलनाच्या नावावर अराजकता यायला नको, या मताचा मी आहे. पण देशात खूप घोटाळे होत आहेत. हे वेळीच सुधारा नाहीतर बाबा रामदेवला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी प्रेमाने वागावे’
सर्वांनीच आपली भूमिका योग्यरितीने निभवावी. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर पालकांप्रमाणे प्रेम करावे आणि सत्ताधाऱ्यांना जनतेने निवडून दिले आहे, हे समजून विरोधकांनी त्यांचा अनादर करू नये. ही खरी लोकशाही आहे. दोघांनाही हात पुढे करून एकमेकांना जवळ करावे लागेल. बाकी मेलोनी-पेलोनीला मी ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी दिली.





