हिंगोलीतील शाळेच्या मुख्याध्यापकांवर मद्यपानाचा आरोप; कारवाई न झाल्यास अभिजीत दीपके उपोषणाला बसणार
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शिक्षण अधिकाऱ्यांना जाब; पाच वर्गांसाठी केवळ दोन शिक्षक असल्याने शैक्षणिक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

हिंगोली : जिल्ह्यातील लिंबाळा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मद्यपान केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थी प्रश्नांवर आंदोलन करणारे अभिजीत दीपके यांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला.
मुख्याध्यापकांवर मंगळवारपर्यंत बदली किंवा पदावरून हटविण्याची कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थांसोबत आपण स्वतः उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दीपके यांनी दिला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपची नवी जबाबदारी; राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सहप्रभारी
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, मुख्याध्यापकांच्या कथित मद्यपानाच्या सवयीमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकांची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शाळेतील शिक्षकांची कमतरता हीदेखील गंभीर समस्या असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. पाच वर्गांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांवरील आरोपांची चौकशी करण्याबरोबरच शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अभिजीत दीपके यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन केले आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरही त्यांनी आंदोलन केले होते. सध्या राजकारणात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता लिंबाळा शाळेच्या प्रश्नावर त्यांनी प्रशासनाला कारवाईसाठी मुदत दिल्याने पुढील काळात आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे.





