Nagpur Crime News: हसनबागमध्ये हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
नंदनवन पोलिसांची कारवाई; आरोपीविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती, चालकाचा शोध सुरू

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग परिसरात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. रोशन गायकवाड ऊर्फ गोट्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नंदनवन पोलिसांनी त्याला वणी येथून ताब्यात घेतले.
गुरुवारी मध्यरात्री हसनबाग फ्लायओव्हरखाली हवेत गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी रोशन गायकवाड याचा शोध घेत त्याला वणी येथून अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हसनबाग परिसरातील एका गुन्हेगारासोबत रोशन गायकवाड याचा वाद होता. याच वादातून गोळीबाराची घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी संबंधित कारचा क्रमांक शोधून काढला असून, कारच्या चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचा सध्या शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात रोशन गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारामागील नेमके कारण, शस्त्राचा वापर आणि या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा – पुरंदरला दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करा; शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
दोन महिन्यांत गोळीबाराच्या तीन घटना
नागपूर शहरात गेल्या दोन महिन्यांत गोळीबाराच्या तीन घटना समोर आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. २६ ऑगस्ट रोजी भांडेवाडीतील श्रावणनगर परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सात आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.
त्यानंतर १० सप्टेंबरच्या रात्री बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटाळ-पांजरी परिसरात जुन्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून गोळीबार झाला. या घटनेत प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित कार्तिक धार्मिक जखमी झाला होता.
आता हसनबाग फ्लायओव्हरखाली सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री हवेत गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





