विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात भरारी घ्यायची याची ध्येय निश्चिती करा – अनिल वखारिया
प्रतिभा ग्रुपमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; परदेशी भाषा केंद्र सुरू करण्याची डॉ. दीपक शहा यांची घोषणा

चिंचवड, : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनियर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांचा 80 वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल वखारिया व जागतिक शांतता राजदूत पवनकुमार पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
उपस्थितांनी समूहाने ‘वंदे मातरम’ व राष्ट्रगीताचे सादरीकरण करून ‘भारत माता की जय’चा जयघोष दिला. श्री. वखारिया व श्री. पटेल यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते शाल व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या सुमारे 120 विद्यार्थ्यांच्या भव्य पथसंचलनाने झाली. सैनिकी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी बँड पथकासमवेत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या पथसंचलनाचे संयोजन माजी सुभेदार रमेश वराडे, प्रशिक्षक कीर्ती मिसाळ व बँडमास्तर प्रसाद ग्रो यांनी केले.
व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. वृंदा-मुलतानी जोशी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, लिझा सोजू यांच्यासह विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री. वखारिया व श्री. पटेल यांच्या समवेत उपस्थितांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिक्षण, कला, क्रीडा, खेळ आदी क्षेत्रात गुणवंत, विशेष नैपुण्य प्राप्त व विशेष मेहनत घेणाऱ्या प्राध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.
हेही वाचा – हिंगोलीतील शाळेच्या मुख्याध्यापकांवर मद्यपानाचा आरोप; कारवाई न झाल्यास अभिजीत दीपके उपोषणाला बसणार

अनिल वखारिया म्हणाले, “विद्यार्थ्यांनो देशाचे भवितव्य तुम्ही आहात. कोणत्या क्षेत्रात भरारी घेणार आहात याची दिशा आताच निश्चित करा. हे स्पर्धेचे युग आहे. भविष्यातील आपले स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, कष्ट व अभ्यास करा. पालकांनी देखील मुलांची आवड ओळखून त्यांना सहकार्य व प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांबरोबरच पालकांचीही ती जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सामान्यज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही देशपातळीवर स्पर्धा परीक्षा घेतो. त्यात सहभागी होऊन प्राविण्य मिळवावे.”
पवनकुमार पटेल म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबर जर्मन, जपानी व इतर युरोपियन भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळवावे. जर्मनीसारख्या देशात मोफत शिक्षणाबरोबर रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. याची माहिती अनेक पालक व विद्यार्थ्यांना नसते. मी एका छोट्याशा गावातून पुढे आलो आहे. आजची युवा पिढी उत्तम शिक्षणासाठी पालकांवर अवलंबून राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केवळ अभ्यासासाठी किंवा तंत्रज्ञानासाठी परदेशावर अवलंबून राहू नये. विद्यार्थ्यांनी स्वतःला शिक्षण व रोजगारासाठी सक्षम करावे.”
श्री. पटेल यांच्या आवाहनानंतर डॉ. दीपक शहा यांनी मंचावरूनच महाविद्यालयात लवकरच परदेशी भाषा शिकण्याचे वर्ग सुरू करण्याबत सामंजस्य करार करण्याची घोषणा केली. त्यामुळे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील इतर विद्यार्थ्यांनाही परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा म्हणाले, “80 वा स्वातंत्र्य दिन आपल्याला अनेक स्वातंत्र्यवीर व पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानातून मिळाला आहे. स्वातंत्र्य आपल्याला अभिमान देते पण त्यासोबतच देशाप्रती असलेल्या कर्तव्याची व जबाबदारीची आठवण करून देते. आज खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ विचारस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य असा आहे. युवा पिढीने कुटुंब, समाज व देशाला अधिक समृद्ध कसे करता येईल हे आपले आद्य कर्तव्य समजावे. आज जगात तंत्रज्ञानात खूप वेगाने बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनी सजग राहून बदलते तंत्रज्ञान अभ्यासून आत्मसात करून सक्षम भारताच्या उभारणीसाठी आपले योगदान द्यावे हेच आजच्या स्वातंत्र्यदिनी अभिप्रेत आहे. येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने अभ्यास करून प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करून भविष्यात उत्तम नागरिक बनावे.”
कार्यक्रमात स्वातंत्र्यावर आधारित ‘बंगभंग’ नाटक सादर करण्यात आले. त्याचे दिग्दर्शन प्रभाकर पवार यांनी केले. सहभागी कलाकारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. क्षितिजा गांधी यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. रोहित आकोलकर व प्रा. ज्योती इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





