ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात झळकणार त्यागमूर्ती माता रमाईंचे तैलचित्र..!

नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या उपसूचनेला सर्वानुमते मंजुरी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

त्याग, संघर्ष आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन सभागृहात लावण्यात येणार आहे. यासंदर्भातील उपसूचना नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडली. या उपसूचनेला सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिल्याने लवकरच महापालिका भवनात माता रमाई यांचे तैलचित्र विराजमान होणार आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमादरम्यान, दि. २८ एप्रिल रोजी पिंपरी चौक येथे उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे समाजाच्या वतीने महापालिका भवन आणि सभागृहात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्याची सूचना केली होती. माता रमाई यांच्या त्यागमय जीवनातून समतेची, संघर्षाची आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा

उद्योग संधी विषयी जागरूक राहिले पाहिजे – शरद राठी

याच सूचनेचा पाठपुरावा करत नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत उपसूचना मांडली. सभागृहातील सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला आणि मंजुरी प्रदान केली.

या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात सामाजिक समतेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करणारे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असल्याची भावना व्यक्त होत आहे. लवकरच महापालिका भवन व सभागृहात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे तैलचित्र स्थापित करण्यात येणार असून, ते सामाजिक समतेच्या विचारांची प्रेरणा देणारे कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह ठरणार आहे.

“विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांचे योगदान अमूल्य आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांनी केलेल्या सूचनेचा पाठपुरावा करत मी सर्वसाधारण सभेत ही उपसूचना मांडली. सभागृहाने ती सर्वानुमते मंजूर केल्याबद्दल माननीय महापौर रवी लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मनःपूर्वक आभार. लवकरच महापालिका भवनात माता रमाई यांचे तैलचित्र स्थापित होईल आणि ते सामाजिक न्याय, समता व मानवतेच्या विचारांची प्रेरणा देणारे कायमस्वरूपी स्मृतिस्थळ ठरेल, असा मला विश्वास आहे.”

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button