पुण्यात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’; विदर्भासह राज्यात पुढील काही दिवस कसे असेल हवामान?

पुणे | मागील काही दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातलेल्या वादळी पावसाचा प्रभाव आता काहीसा ओसरू लागला आहे. तरीदेखील उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर अजूनही कायम आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे घाट प्रदेशात हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी करत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा घाट प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याउलट, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शनिवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून तिथे पावसाचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारपासून मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशातही पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा
‘कॉक्रोच जनता पार्टी’ राजकारणात प्रवेश करणार का? प्रवक्त्यांचे सूचक विधान; म्हणाले…
संपूर्ण विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता असून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचे प्रमाण घटत असल्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात सध्या विविध हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळे काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या पावसाची नोंद होत आहे. पावसाचा जोर कमी होत असला तरी घाट भागात प्रवास करताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





