अनाहत सिंगनं रचला इतिहास! ज्युनियर स्क्वॉश विश्व अजिंक्यपद स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद

Anahat Singh | भारताची १९ वर्षीय स्टार स्क्वॉशपटू अनाहत सिंगने कॅनडातील ओन्टॅरिओ येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक सुवर्णवेध घेतला आहे. अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित इजिप्तच्या रुकाया सालेमचा सरळ सेट्समध्ये पराभव करत अनाहतने विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी ती पहिलीवहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
अंतिम लढतीत दिल्लीच्या अनाहतने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि खणखणीत खेळ केला. तिने इजिप्तच्या रुकाया सालेमचा 11−3,11−7,11−9 असा पराभव केला. या विजयामुळे गेल्या १६ वर्षांपासून या स्पर्धेत चालत आलेले इजिप्तच्या खेळाडूंचे वर्चस्व अनाहतने संपुष्टात आणले आहे. याआधी केवळ जोश्ना चिनप्पा हिने या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, चिनप्पाचा तो विक्रम मोडून अनाहतने थेट चषक उंचावत नवा इतिहास रचला.
???????????? अनाहत सिंगनं रचला इतिहास! ज्युनियर स्क्वॅश विश्व अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद
भारताच्या अनाहत सिंगनं ज्युनियर स्क्वॅश विश्व अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
अंतिम सामन्यात अनाहतनं इजिप्तच्या… pic.twitter.com/30Wj7HMokx
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 26, 2026
अपयशाच्या साखळीतून सुवर्ण यश
विजयानंतर ‘स्क्वॉश टीव्ही’शी बोलताना भावुक झालेल्या अनाहतने सांगितले, “मला अजूनही स्वप्नात असल्यासारखेच वाटत आहे. ही स्पर्धा आतापर्यंत माझ्यासाठी एका दुस्वप्नासारखी होती. कधी क्वार्टरफायनल तर कधी सेमी फायनलमध्ये माझे आव्हान संपुष्टात आले होते. वयोमर्यादेमुळे माझ्यासाठी या स्पर्धेत खेळण्याची ही शेवटचीच संधी होती आणि अखेर चित्र बदलले.”
अनाहतला २०२२ ते २०२४ या काळात सातत्याने उपांत्यपूर्व फेरीतच (Quarter-final) पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी सेमी फायनलमध्ये हरल्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, या सर्व अपयशांवर मात करत तिने शेवटच्या संधीचे सोने केले.
‘२०२८ ऑलिम्पिक’वर नजर
अनाहतला या यशासाठी माजी विश्वविजेते ग्रेगरी गॉल्टिअर आणि भारताचा दिग्गज खेळाडू सौरभ घोषाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता २०२८ च्या लॉस एंजिलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अनाहत सिंग भारतीय स्क्वॉश संघाचे नेतृत्व करेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.





