TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना; तरुणाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

‘आयफोन’ हेच आत्महत्येमागचे कारण? DCP रत्नाकर नवले म्हणाले, ‘आताच निश्चित सांगता येणार नाही’; पोलीस तपास सुरू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर शुक्रवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणाने डोंगरावरून उडी घेत जीवन संपवले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना वडिलांचाही तोल गेला. त्यानंतर आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याने या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेनंतर तरुणाने टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर तरुणाला आयफोन हवा होता किंवा त्याने आयफोन घेतला होता आणि त्याचे हप्ते फेडणे शक्य होत नसल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र, आयफोन हेच आत्महत्येमागचे कारण होते, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फक्त आयफोन हेच कारण होतं, असं सांगता येणार नाही’

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे DCP रत्नाकर नवले यांनी प्राथमिक तपासाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तरुणाने हे टोकाचे पाऊल फक्त आयफोनच्या कारणामुळे उचलले होते की त्यामागे आणखी काही कारणे होती, हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही.

“या घटनेला अजून २४ तास पूर्ण व्हायचे आहेत. प्राथमिक तपासात तरुण तणावात असल्याचे दिसून येते. मात्र, केवळ आयफोन हेच कारण होते, असे आताच सांगता येणार नाही. आणखी काही कारणे असण्याची शक्यता आहे. तपासातून पुढील बाबी समोर येतील,” असे DCP नवले यांनी सांगितले.

हेही वाचा –  देशभरात पावसाचा कहर; दिल्लीसह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसांसह सर्वांनी प्रयत्न केले. त्याच्याशी संवाद साधून त्याची अडचण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांकडून त्याला त्याच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची आईदेखील त्याच्याशी बोलत होती. स्थानिक नागरिकांकडूनही त्याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही ही दुर्दैवी घटना टळू शकली नाही.

तो तणावात होता, त्याचे वाद झाले होते’

DCP नवले यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात तरुण तणावात असल्याचे दिसून आले आहे. त्याचे काही वाद झाले होते, अशी माहितीही समोर आली आहे. मात्र, नेमका वाद कोणता आणि त्याचा या घटनेशी कितपत संबंध आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणातील कुटुंबातील कोणताही सदस्य साक्षीदार म्हणून जिवंत नसल्याने घटनेमागील नेमके कारण शोधणे पोलिसांसाठी अधिक महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे ‘आयफोन’ हेच कारण होते, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button