दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती अन् डॉ. वैशाली घोडेकर यांना अश्रू अनावर..!
'दादांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वास ठेवला, हे ऋण कधीही फेडू शकत नाही...'

पिंपरी- चिंचवड : विशेष प्रतिनिधी
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांना अश्रू अनावर झाले. दादांच्या आठवणींनी त्या इतक्या भावूक झाल्या की, काही क्षण त्यांना आपल्या भावना शब्दांत व्यक्त करणेही कठीण झाले. राजकारणात एका सामान्य महिला कार्यकर्तीला संधी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा नगरसेवकपदाची उमेदवारी आणि त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदाचा बहुमान मिळवून देणाऱ्या दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले.
डॉ. वैशाली घोडेकर यांच्या राजकीय प्रवासात दिवंगत अजित पवार यांचे स्थान हे केवळ एका नेत्याचे नव्हते, तर मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे होते. त्यांनी केवळ पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिली नाही, तर त्यांच्या नेतृत्वगुणांची पारख करून त्यांना मोठ्या जबाबदाऱ्याही दिल्या. त्याच विश्वासाच्या बळावर डॉ. घोडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा निवडणुकीची संधी मिळाली आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली.
दिवंगत अजित पवार यांच्यासाठी कार्यकर्ता हा केवळ पक्षाचा घटक नव्हता, तर तो त्यांच्या विस्तारित कुटुंबाचाच एक भाग होता. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना संधी देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळेच आजही हजारो कार्यकर्त्यांच्या मनात दादांबद्दलचा जिव्हाळा कायम आहे.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना डॉ. वैशाली घोडेकर यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. प्रतिमेसमोर नतमस्तक होताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. अनेक वर्षांच्या आठवणी क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर तरळल्या. आपल्या राजकीय आयुष्याला दिशा देणाऱ्या नेत्याच्या स्मृतींनी त्या काही काळ स्तब्ध झाल्या.
हेही वाचा – पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब
हिच खरी दादांना श्रद्धांजली..!
यावेळी भावना व्यक्त करताना डॉ. घोडेकर म्हणाल्या, “दिवंगत अजितदादांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वास ठेवला. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा उमेदवारी दिली आणि पहिल्याच टर्ममध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपविली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास होता. दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांचे संस्कार, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेली शिकवण आयुष्यभर माझ्यासोबत राहील. त्यांचे माझ्यावर असलेले ऋण मी कधीही फेडू शकत नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “दादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर प्रत्येक कार्यकर्त्याला उभारी देणारे व्यक्तिमत्त्व होते. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मानणारा हा नेता आज आपल्यात नाही, ही वेदना आजही मनाला अस्वस्थ करते. त्यांच्या आठवणी आजही प्रत्येक क्षणी सोबत आहेत. त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालत समाजासाठी काम करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही हा क्षण भावूक करून गेला. डॉ. वैशाली घोडेकर यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू हे एका नेत्याविषयीच्या आदराचे, प्रेमाचे आणि जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक होते. दादांनी दिलेल्या संधीमुळे घडलेला राजकीय प्रवास आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना अनेकांचे डोळे पाणावले. मात्र, डॉ. वैशाली घोडेकर यांच्या अश्रूंनी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली की, काही नाती ही राजकारणाच्या पलीकडची असतात. ती विश्वासाची, मायेची आणि आयुष्य घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाविषयीच्या अखंड कृतज्ञतेची असतात. म्हणूनच दादा आज जरी आपल्यात नसले, तरी त्यांनी जपलेली माणसं आणि त्यांनी दिलेली मूल्यं आजही जिवंत आहेत.





