क-प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’मध्ये!
प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट क्षेत्रीय कार्यालयात!

– आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वातील युवा नेतृत्वाचा प्रशासनावर प्रभावी ठसा
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे मोशी प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवक तथा ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू केला असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी थेट क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून जनसंपर्क आणि समस्यांच्या निवारणाला प्राधान्य दिले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच त्यांची ‘क’ प्रभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, त्यानंतर त्यांनी नागरिकाभिमुख कामाला सुरुवात केली आहे.
‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून निखिल बोऱ्हाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि कामकाजाला सुरूवात केली. यावेळी परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा समस्या तसेच इतर नागरी सुविधांबाबत नियोजन करण्यात आले. आगामी काळात नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेत बोऱ्हाडे यांनी काही तातडीच्या प्रश्नांवर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले. तर उर्वरित कामांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना शासकीय व महापालिकेच्या सेवा वेळेत मिळाव्यात आणि त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.
हेही वाचा – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती अन् डॉ. वैशाली घोडेकर यांना अश्रू अनावर..!

राजकारणापेक्षा जनकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून निखिल बोऱ्हाडे यांनी मोशी परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भाजपाचे शहरातील प्रभावी नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ते सातत्याने विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी ओळखले जातात. ‘क’ प्रभाग अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते अधिक सक्रिय झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधत प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची नोंद घेऊन त्यावर कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
निखिल बोऱ्हाडे म्हणाले की, “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला प्रशासकीय सेवा वेळेत मिळाव्यात आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न निरंतर सुरू राहतील. नागरिकांनी मांडलेला प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामे आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत राहू.” पदभार स्वीकारताच नागरिकांच्या प्रश्नांवर थेट क्षेत्रीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रश्न सोडविण्याच्या निखिल बोऱ्हाडे यांच्या कार्यपद्धतीमुळे ‘क’ प्रभागात भाजपच्या नागरिकाभिमुख कारभाराची प्रभावी सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“‘क’ प्रभाग अध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी ही माझ्यासाठी केवळ पद नसून, नागरिकांची सेवा करण्याची मोठी संधी आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘विकास आणि विश्वास’ हे सूत्र घेऊन आम्ही काम करीत आहोत. प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून, त्याच्या निराकरणासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जाईल. नागरिकांना कोणत्याही कामासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांच्या समस्या वेळेत मार्गी लागाव्यात आणि महापालिकेच्या सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी मी कटिबद्ध आहे. ‘क’ प्रभागातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन उभे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
— निखिल बोऱ्हाडे, अध्यक्ष, ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग), भारतीय जनता पार्टी.





