मुंबईत पावसाचा तडाखा: वाहतुकीवर परिणाम, रेल्वे उशिरा !
मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत, लोकल व रस्ते बंद....

मुंबई : मुंबईत रविवारी सायंकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर रविवारी मध्यरात्रीपासून अधिकच वाढला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचू लागले असून, याचा परिणाम मुंबईतील दळणवळण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत आहे.
🚨 रेल्वे आणि मोनोरेल सेवा विस्कळीत
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल सेवांवरही पावसाचा परिणाम जाणवतो आहे. मध्य आणि हार्बर मार्गांवर लोकल सेवा सरासरी 10 मिनिटे उशीराने धावत आहेत.
वडाळा परिसरात मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
🌊 अंधेरी सबवेत पाणी साचले, वाहतूक बंद
अंधेरी पश्चिम येथील अंधेरी सबवे परिसरात सुमारे 1 ते 1.5 फूट पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. वाहनचालकांसाठी वाहतूक गोखले ब्रिज मार्गे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना पर्यायी मार्गाचा वापर करावा.
🚗 रस्त्यांवर ट्रॅफिक जाम, कार्यालयीन वेळेवर परिणाम
सकाळी कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दादर, सायन, कुर्ला, वांद्रे, खांदेश्वर आदी भागांत रस्ते व रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
सायन ते दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
⚠️ हवामान विभागाचा अलर्ट: वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस
IMD (हवामान खातं) मुंबईनं दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही तासांत ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे, विशेषतः सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सूचना महत्त्वाची आहे.





