Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांनी भाजपच्या बदनामीची सुपारी घेतलीय – सागर अंघोळकर

दोन्ही आमदारांची बैठक निष्फळ, पिंपळे गुरवमध्ये आमदारांच्या घरालाही पाणी टंचाईची झळ

पाणी, कचरा प्रश्नांवरुन भाजप नगरसेवकांना स्थायी सभा त्यागाची नामुष्की 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सत्ताधारी भाजपची सत्ता येवून दोन वर्षे लोटत आली,  तरी आजही शहरातील कचरा आणि पाणी प्रश्न सुटलेला नाही. प्रभागातील नागरिकांनी पाणी, कचरा प्रश्नावरुन नगरसेवकांना जाब विचारल्याने स्थायी समितीच्या आज ( बुधवारी) झालेल्या सभेत पडसाद उमटले. पिंपळे गुरवचे भाजप नगरसेवक सागर अंघोळकर आणि दिघी-बोपखेलचे नगरसेवक विकास डोळस यांनी स्थायीची सभा त्याग करुन पाणी पुरवठा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच कृत्रिम पाणी टंचाई व कचरा प्रश्न न सुटल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी भाजपच्या बदनामीची सुपारी घेतलीय, असा गंभीर आरोपही अंघोळकर यांनी केला. तब्बल दीड तास चाललेल्या स्थायी समितीचे सभा अखेर तहकुब करण्यात आली. 

स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.  अंघोळकर म्हणाले की, शहरात पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. मागील महिन्यात आयुक्तांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. तेव्हा आठवडाभर पाणी पुरवठा सुरळीत झाला. मात्र, पिंपळे गुरवला पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई व कचरा प्रश्न भेडसावत आहेत. याशिवाय प्रभागात आम्ही सुचविलेली कामे अधिकारी काढत नाहीत. रस्ते वर्गीकरणाची कामे केली जात नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा व कचरा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले की,  बोपखेल-दिघी परिसरातही पाणी व कचरा प्रश्न सुटलेला नाही. पाणी टंचाईमुळे प्रभागात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही टंचाई होवू लागली आहे. त्यामुळे आयुक्तांनी आमच्या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, याकरिता स्थायी समिती सभा त्याग केली. यावर तत्काळ लक्ष न दिल्यास संबंधित अधिका-यांना घरी घालविल्याशिवाय स्वस्थ थांबणार नाही, असे ते म्हणाले.

नगरसेवक राजू मिसाळ म्हणाले की, सत्ताधारी नगरसेवकांची कामे अधिकारी करीत नाहीत, मग विरोधकांचा विषयच संपला, पाणी, कचरा, भटकी कुत्रे यासह अन्य प्रश्नावर महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करुन सत्ताधारी नगरसेवकांनी स्थायी समिती सभा त्याग केली. त्यामुळे कामेच होत नसल्याने सत्ताधा-यावर एवढी नामुष्की आेढावली आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रलंबित प्रश्नाबाबत दोनच दिवसापुर्वी सर्व विभाग प्रमुखांची आयुक्तांसमवेत बैठक घेतली. त्या बैठकीत अधिका-यांनी कामे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतू, दोन्ही आमदारांनी पाणी, कचरा, रस्ते यासह अन्य प्रश्नावर चर्चा करुन प्रश्न सोडविण्याची ताकीद केली. परंतू, भाजपच्या नगरसेवकांनी पाणी व कचरा प्रश्नावर केलेल्या सभा त्यागामुळे दोन्ही आमदारांनी घेतलेली बैठक निष्फळच ठरल्याचे दिसत आहे.

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button