ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

देहूतील संत जिजाबाई कन्या विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती

‘माझा डेटा, माझी जबाबदारी’चा संदेश; ओटीपी, संकेतशब्द आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन

देहू, पुणे : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता विद्यार्थिनींमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात पार पडले. क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाला विद्यार्थिनी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सत्रात विद्यार्थिनींना ओटीपी फसवणूक, मजबूत संकेतशब्द, संशयास्पद लिंक, मोबाईल ॲपच्या परवानग्या, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल माध्यमांचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी प्रत्यक्ष जीवनातील सायबर फसवणुकीच्या घटनांची उदाहरणेही देण्यात आली.

‘ओटीपी किंवा संकेतशब्द कोणाशीही शेअर करू नका’

विद्यार्थिनींनी अनोळखी व्यक्तींशी ओटीपी, संकेतशब्द किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, प्रत्येक ऑनलाइन खात्यासाठी वेगळा व मजबूत संकेतशब्द वापरावा आणि अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच मोबाईल ॲप्सना केवळ आवश्यक तेवढ्याच परवानग्या द्याव्यात आणि अनावश्यक परवानग्या टाळाव्यात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा तसेच सायबरक्राइम डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अशी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. या सत्राचे मार्गदर्शन गायत्री पाटील आणि माधुरी पाटील यांनी केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करण्यात आले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डिजिटल सुरक्षेच्या विविध पैलूंची माहिती घेतली.

क्विक हील फाउंडेशनच्या प्रेरणेतून उपक्रम

हा उपक्रम एमआयटी एसीएससी, आळंदी यांच्या सहकार्याने आणि क्विक हील फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनुपमा काटकर तसेच सहयोगी संचालक श्री. अजय शिर्के यांच्या प्रेरणेतून विविध शाळांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. एमआयटी एसीएससी, आळंदीचे प्राध्यापक समन्वयक श्री. अमित तळे यांचेही या उपक्रमाला मार्गदर्शन लाभत आहे. ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ हा संदेश देत विद्यार्थिनींनी सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचा निर्धार व्यक्त केला. बदलत्या डिजिटल युगात विद्यार्थिनींना तंत्रज्ञानासोबतच सायबर सुरक्षेचे ज्ञान देणे आवश्यक असून, अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे सुरक्षित डिजिटल समाजनिर्मितीला निश्चितच हातभार लागेल, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button