breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

४५५ तळीरामांना हिसका!

मद्याच्या नशेत वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई; सहा महिने परवाना निलंबनाबाबत आरटीओकडे प्रस्ताव

मुंबई : नववर्ष स्वागतासाठी रस्त्यांवर उतरलेल्या ४५५ पेलाप्रेमी वाहनचालकांना पोलिसांनी पकडले, तर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन हाकल्याबद्दल १११४ चालकांवर कारवाई केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्सवी उन्मादात घट दिसून आली. या आकडेवारीवरून वाहनचालकांवरला कारवाईचा धाक वाढल्याचे निरीक्षण वाहतूक पोलीस नोंदवतात.

अपघात टळावेत आणि सण-उत्सवांच्या काळात दारूच्या नशेत वाहन चालवले तरी चालते, ही मानसिकता मोडून काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सोमवार सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू केली. मंगळवार पहाटेपर्यंत या नाकाबंदीत ९८०० संशयास्पद चालकांना श्वास विश्लेषक यंत्रांद्वारे तपासले. त्यापैकी ४५५ चालकांनी दारूच्या नशेत वाहन चालवल्याचे स्पष्ट झाले. नाकाबंदी आणि शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या वेगमापक कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांआधारे मर्यादेपेक्षा जास्त वेगात, बेदरकारपणे वाहन हाकणाऱ्या १११४ चालकांविरोधात ई-चलन बजावण्यात आले. या कालावधीत वाहतुकीचे अन्य नियम मोडणाऱ्या ९१२१ चालकांविरोधातही कारवाई केली गेली. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकांचा परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याबाबत वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) प्रस्ताव पाठवला. गेल्या वर्षी नववर्ष स्वागतादरम्यान दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ६१५ चालकांवर कारवाई झाली होती, तर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या, बेदरकारपणे वाहन हाकणाऱ्या ७६०० चालकांना ई-चलनद्वारे दंड आकारण्यात आला. त्या तुलनेत यंदाच्या नियमभंगांचे प्रमाण कमी आढळले.

सीसीटीव्हीआधारे ई-चलन कारवाई, वेगमापक कॅमेरे, नाकाबंदी या कारवाईची जरब वाहनचालकांवर दिसते. तसेच चालक सजग झाल्याचेही स्पष्ट होते. ही सकारात्मक बाब आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्रायव्हिंग’चे प्रकार कमी होताना दिसतात. त्यामुळे अपघातांचा आलेखही उतरता दिसतो.

– अमितेश कुमार, सहआयुक्त, वाहतूक पोलीस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button