breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा संकलन व वाहतूक कामासाठी 19 निविदा प्राप्त

चारही निविदाची पाकिटे बुधवारी उघडली, कच-याच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा संकलन व कचरा वाहतूक कामासाठी काढलेली वादग्रस्त निविदा रद्द झाली, त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी नव्याने चार निविदा मागविल्या. या कामामध्ये प्रतिटन 1641 हा दर गृहित धरत एकूण वर्षभरासाठी सुमारे 51 कोटी रुपयांचा खर्च धरला आहे. दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी एका ठेकेदाराची नेमणूक करुन संबंधित कंत्राटासाठी आठ वर्षाचा कार्यकाल निश्चित केला आहे. दरम्यान, चार निविदांची मुदत संपल्यानंतर त्या निविदा प्रक्रियेची आज (बुधवारी) पाकिटे उघडण्यात आली. यामध्ये चार कामासाठी एकूण 19  निविदा प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत पात्र-अपात्र निविदा स्थायी समितीपुढे सादर करण्यात येणार आहे. 

कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी मुंबई-पुणे महामार्गाचा आधार घेत सत्ताधा-यांनी दोन निविदा काढल्या. ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स 28 कोटी 52 लाख आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड 27 कोटी 90 लाख रुपयात या दोन कंत्राटदारांना हे काम देण्यास 21 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने बहुमताचा जोरावर मंजुरी दिली. तथापि, विरोधकांनी यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

त्यानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कक्षाच्या तज्ज्ञांमार्फत या कंत्राटाची सखोल चौकशी केली. निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा अहवाल राज्य सरकारने 10 एप्रिल रोजी महापालिकेला दिला होता. तथापि, सत्ताधा-यांनी 11 एप्रिल 2018 रोजीच्या स्थायीमध्ये कचरा संकलन आणि वाहतूक कामाचा ठेका रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारचा अहवाल दप्तरी दाखल करण्याचा ठराव 2 मे 2018 रोजी केला.त्यानंतर 7 मे 2018 रोजी आयुक्तांनी कचरा संकलन व वाहतूक कामाची निविदा रद्द केल्याचे कंत्राटदारांना कळविले.

त्याचबरोबर आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी आठ कंत्राटदार नेमण्याचा ठराव केला. त्यानंतर आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ऐवजी दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक कंत्राटदार नेमावा अशी दुरुस्ती स्थायी समितीने केली. तसेच स्थायी समितीने ए.जी.एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्याकडून निविदेचे दर कमी करुन त्यांचा एेनवेळी विषय स्थायीपुढे ठेवून ठरावास मान्यता दिली. याविषयी आयुक्त हर्डिकर यांनी सदरील कोणतीही भूमिका जाहीर केली नाही.

त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी मेसर्स क्रिसील रिस्क अ‍ॅण्ड इन्फा सोल्युशन्स या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली. त्यानुसार या सल्लागार संस्थेने ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय 13 कोटी 17 लाख, ‘ब’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय 15 कोटी 30 लाख, ‘क’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय 10 कोटी 91 लाख आणि ‘ग’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी 11 कोटी 42 लाख रुपये या प्रमाणे चार निविदा तयार केल्या आहेत. त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाने चार निविदा मागविण्यात आल्या. त्या निविदा प्रक्रिया सुरुवातीला प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली.

त्या निविदा प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर आज (बुधवारी) कचरा संकलन व वाहतूक कामाची मागविलेल्या निविदाची पाकिटे उघडण्यात आली. त्यामध्ये अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयास 6 निविदा, ब आणि ड क्षेत्रीय कार्यालयास 4 निविदा,  क आणि इ क्षेत्रीय कार्यालयास 4 निविदा, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयास 5 निविदा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे चार प्रभागांच्या एकूण 19 निविदा प्राप्त झालेल्या आहेत. त्या निविदाचे पात्र-अपात्र आणि दर निश्चिती करुन सदरील विषय लवकरच स्थायीपुढे मान्यतेस ठेवण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button