breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रातवा पक्ष्याचे १०५ वर्षांनंतर मुंबईत दर्शन

मुंबईसारख्या शहरी भागात स्थलांतर करण्यासाठी अत्यंत दुर्मीळ मानला जाणाऱ्या ‘साईक्सचा रातवा’ (साईक्स नाईटजार) या पक्ष्याचे पक्षीनिरीक्षकांना मंगळवारी भाडुंप उदंचन केंद्रात दर्शन झाले. साधारण १०५ वर्षांनंतर या पाहुण्या पक्ष्याचे मुंबईत दर्शन झाल्याचा दावा पक्षी अभ्यासकांनी केला आहे.

इराक आणि पाकिस्तानमध्ये प्रजनन करून हिवाळ्यात भारतातील गुजरात आणि राजस्थानच्या सीमालगतच्या भागात स्थलांतर करणाऱ्या साईक्सचा रातवा पक्ष्याचे मुंबईत दर्शन झाले आहे. हा पक्षी गवताळ प्रदेशात स्थलांतर करणे पसंत करतो. निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या छोटे कीटक आणि किडय़ांवर त्याची गुजराण होते. तर सकाळच्या वेळेत उंच गवतामध्ये लपून बसून हा पक्षी आराम करतो. ब्रिटिश सन्यातील अधिकारी विलयम हॅन्री साईक्स यांनी या पक्ष्यांचा शोध लावल्याने या पक्ष्याला साईक्सचा रातवा असे नाव पडले. भांडुप उदंचन केंद्रात या रातव्या पक्ष्याचे मंगळवारी पहाटे दर्शन घडले. भवन्स महाविद्यालयात वन्यजीव संवर्धन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी अक्षय शिंदे आणि पक्षीनिरक्षणामध्ये रस असणाऱ्या हेमा सागरे यांना हा पक्षी गवताळ परिसरात आढळून आला.

‘मंगळवारी पहाटे भांडुप उदंचन केंद्राच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो असता पायवाटेजवळील गवताळ क्षेत्रात रातव्या पक्ष्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे आम्ही थांबून निरीक्षण केले असता त्या ठिकाणी गवतामध्ये रातवा पक्षी बसल्याचे आढळून आले,’ अशी माहिती अक्षय शिंदे याने दिली. हा पक्षी मुंबईसारख्या क्षेत्रात दिसणे दुर्मीळ असल्याची कल्पना असल्याने तज्ज्ञ पक्षी अभ्यासक संजोय मोंगा यांना या पक्ष्याचे छायाचित्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मोंगा यांनी हा पक्षी १९१४ साली कल्याण भागात आढळून आल्याची नोंद बीएनएचएसच्या यादीत असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील  पक्षीनिरीक्षणाची नोंद ठेवणाऱ्या ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर देखील महाराष्ट्रातून आजवर या पक्ष्याची नोंद झालेली नाही.

इराक, पाकिस्तान येथून हिवाळ्यात गुजरात आणि राजस्थानच्या सीमेलगतच्या भागापर्यंत रातव्याचे स्थलांतर होते. त्यामुळे मुंबईत या पक्ष्याचे दर्शन होणे हा अत्यंत दुर्मीळ योग आहे. भांडुप उदंचन केंद्राच्या परिसरात गवताळ प्रदेश असल्याने या पक्ष्यासाठी तो चांगला अधिवास आहे.

– अविनाश भगत,  तज्ज्ञ पक्षीअभ्यासक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button