breaking-newsमहाराष्ट्र

सिद्धू भाजपात असते तरी ‘स्वबळावर’ पाकडय़ांची चाटून आले असते – उद्धव ठाकरे

सिद्धू याच्या पाकप्रेमाचा निषेध करणाऱ्यांनी डॉ. अब्दुल्ला यांच्यावरील हल्ल्याचाही निषेध करायला हवा, पण सिद्धू व डॉ. अब्दुल्ला यांच्यात तफावत व वेगळे राजकारण आहे. डॉ. अब्दुल्लांवर हल्ला करणारे कुणी स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर देशद्रोहीच होते. त्यांचा फक्त धिक्कार करून चालणार नाही, तर त्यांचेही हात मुळापासून उखडून टाकायला हवेत असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. राममंदिर, 370 कलम, समान नागरी कायदा, पाकिस्तान वगैरे मुद्दे फक्त निवडणुकीचे जुमलेच बनले आहेत. त्या जुमल्यांची पालखी 2019 पर्यंत वाहत राहू द्या असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शतमूर्ख सिद्धू याने पाकिस्तानात जाऊन तेथील लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली. काँग्रेस पक्षाने सिद्धूवर कारवाई करण्यापेक्षा मोदी सरकारने सिद्धूवर कारवाई करावी व असा मूर्खपणा करणाऱ्यांवर वचक ठेवावा अशीच देशवासीयांची मागणी आहे. त्याचे काय झाले? सिद्धू याने पाकिस्तानात जाऊन देशविरोधी कृत्य केले व देशभावनेशी गद्दारी केली हे भाजपने सांगण्याची गरज नाही. सिद्धू हा कालपर्यंत भाजपच्याच कडेवर होता हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे व सिद्धू आज भाजपात असता तरीही इम्रान खानचे आमंत्रण स्वीकारून तो ‘स्वबळावर’ पाकडय़ांची चाटून आला असता असे त्याच्या वर्तणुकीवरून दिसते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. राजकीय, व्यापारी, सांस्कृतिक वगैरे जे काही असतील ते, क्रिकेट तर नाहीच ही आमची भूमिका आहे. भाजपसारख्या पक्षांना ती मान्य असेल तर त्यांनी तसे घोषित करावे. प्रश्न फक्त हिंदूंवर कारवाई करण्याचाच आहे काय? सिद्धूने पाकिस्तानात जाऊन जे शेण खाल्ले ते बाहेर काढून तेच शेण काँग्रेसच्या थोबाडास फासून प्रश्न सुटणार आहेत काय? कारण कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही, तर केंद्रातली सर्व सरकारे जबाबदार आहेत. विशेषतः गेल्या चारेक वर्षांत कश्मीरात हिंसेचे तांडव सुरू आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

श्रीमान सिद्धू हे पाकिस्तानी बिर्याणी पचवून अमृतसरला परतले व आपण ‘शांतिदूत’ असल्याचे त्यांनी जाहीर केले, पण दुसऱ्या दिवशी जो बकरी ईदचा सण साजरा झाला, त्या पवित्र दिवशी कश्मीरात हिंसा भडकली. पोलीस व सैन्यदलांवर हल्ले झाले. त्यात जानमालाचे नुकसान झाले व हे सर्व रोखण्यात सरकार अपयशी ठरले. सिद्धूवर कारवाई व्हायलाच हवी, पण कश्मीरात जे सुरू आहे त्या फुटीरतावादी शक्तींवर कठोर कारवाई करणे हे सोनिया किंवा राहुल गांधींच्या हाती नसून ते श्रीमान नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारच्याच हाती आहे व तिथे कुचराई झाली आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

कश्मीरात पोलिसांच्या हत्या करणारे, भारतमातेविरोधात घोषणा देणारे, ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणारे ‘शांतिदूत’ आहेत व सिद्धू देशद्रोही आहे असा कुणाचा ‘तत्त्ववाद’ किंवा ‘चिंतन’ बैठक असेल तर त्यांनी देशवासीयांना तसे सांगायला हवे. इम्रान खान यानेही सिद्धूचा बचाव केला आहे व सिद्धू शांतिदूत असल्याचे त्याने सांगितले. सैतानाने ‘ओम शांती ओम’चा जप करण्याचाच हा प्रकार. सिद्धू शांतिदूत वगैरे असेल तर मग बकरी ईदच्या दिवशी पाकडय़ांनी कश्मीरात जो हैदोस घातला, रक्तपात घडविला ती काय शांतिदूतांना दिलेली ‘कुर्बानी’ची भेट समजावी काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

कश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली व मागच्या चार वर्षांत ती जास्तच बिघडली आहे. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या भाषणांचा व घोषणांचा कश्मिरी जनतेवर काहीएक परिणाम होत नाही याचे आम्हाला दुःख होते. साऱ्या जगात मोदी जिथे जातील तिथे त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात, पण हिंदुस्थानचे शिरकमल असलेल्या कश्मीर खोऱ्यात मात्र उलट स्थिती आहे अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button