breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“सिंहगड’ पर्यटकांना वाहतूक कोंडीचा जाच

 

  • वनविभाग अनभिज्ञ : वनविभागाचे कुचकामी नियोजन

पुणे – यंदा पुणेकरांना पावसाळी पर्यटन सुरक्षितपणे अनुभवता यावे, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे वनविभागाने सांगितले होते. पण, रविवारी झालेल्या पावसात विभागाची तयारी किती ढोबळ आहे, याचा प्रत्यय आला. पुणेकरांचे पसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या सिंहगड येथील घाट रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी रोखण्यास वनविभागाला पूर्णपणे अपयश आले आहे. यामुळे आगामी काळात पावसाळी पर्यटन कितपत सुरक्षित असेल, याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

पावसाळ्यात सिंहगड परिसरातील निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सिंहगडावर येतात. परिणामी, सिंहगड घाट रस्ता आणि परिसर सभोवताली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रविवारीदेखील अशाच प्रकारची वाहतूक कोंडी झाल्याने घाट रस्त्यावर बराच वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, या रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी असलेला वनविभाग या कोंडीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्यामुळेच घाट रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा होत्या. परिणामी, पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

याबाबत सहायक वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, “घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेत यंदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पूर्णत: खबरदारी घेण्याची तयारी विभागातर्फे करण्यात आली होती. वाहनतळ येथील “पार्किंग फुल्ल’ झाल्यावर गडावर एकही वाहन सोडायचे नाही, घाट रस्त्यामध्ये एकही वाहन थांबणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही परिसरात वाहतूक कोंडी झाली असेल, तर याबाबत नक्कीच चौकशी केली जाईल.’

खड्डेमय रस्त्यांचा पर्यटकांना त्रास
सिंहगडाकडे जाणारा घाट रस्त्यामधील काही भाग हा खचलेला आहे. विशेष म्हणजे, चढाईच्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, वन विभागाकडून याची फारशी दखल घेतली जात नाही. गेल्यावर्षी या रस्त्याबाबत तक्रारी येऊनही यंदा देखील हा रस्ता दुरूस्त करण्यात आलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button