breaking-newsक्रिडा

सिंधूची विजेतेपदासाठी झुंज

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा

माजी विजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत हे सध्या संमिश्र लयीत असले तरी मंगळवारपासून मायदेशात होणाऱ्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्यांच्यासमोर विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.

सायना नेहवालने दुखापतीमुळे आधीच या स्पर्धेतून माघार घेतली असून भारताची सर्व मदार सिंधू आणि श्रीकांत यांच्यावर असणार आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला अव्वल मानांकन मिळाले आहे. चीनमधील अव्वल मानांकित आणि ऑल इंग्लंड विजेत्या चेन युफेई हिने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूलाच विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहे. जपानच्या अव्वल बॅडमिंटनपटूंच्या अनुपस्थितीचा फायदाही सिंधूला होणार आहे.

यंदाच्या मोसमात सिंधूला चांगली सुरुवात करता आलेली नाही. इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या सिंधूला प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र या पराभवांतून बोध घेत सिंधू दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा पहिला सामना मुग्धा आग्रे हिच्याशी होणार आहे. त्यानंतर सिंधूला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी दानिश मिया ब्लिचफेल्ड किंवा हे बिंगजियाओ यांच्याशी लढत द्यावी लागण्याची शक्यता आहे. महिलांमध्ये वृषाली गुम्माडी आणि साई उत्तेजिता राव या युवा बॅडमिंटनपटूही सहभागी होणार आहेत.

पुरुषांमध्ये अव्वल मानांकित शी युकी याने माघार घेतल्यामुळे श्रीकांतला विजेतेपदाची संधी आहे. २०१७ मध्ये चार जेतेपदे पटकावणाऱ्या श्रीकांतला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. त्याला सलामीच्या लढतीत हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेन्ट याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. समीर वर्मा आणि बी. साईप्रणीथ हे श्रीकांतच्याच गटात असल्यामुळे ते एकमेकांशी भिडण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या पाचव्या मानांकित समीरची सलामीच्या सामन्यात डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी गाठ पडणार आहे. एच. एस. प्रणॉय, शुभंकर डे, अजय जयराम आणि पारुपल्ली कश्यप हे भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत नशीब अजमावणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button