सफाई कर्मचारी बनला पुणे महापालिकेचा ‘स्वच्छतादूत’
पुणे |महाईन्यूज|
पुणे महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासून सफाई सेवक म्हणून काम करताना नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे काम करणारे महादेव जाधव यांची ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’साठी स्वच्छतादूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. छोटी-छोटी गाणी म्हणून नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला पालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ मोहिमेचे दूत म्हणून त्यांची नियुक्ती करून अनोखी दाद दिली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जाधव यांना सोमवारी स्वच्छतादूत नेमणुकीचे पत्र देण्यात आले. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.