breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार महेश लांडगे आखाड्यात?

  • प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची उद्या शहरात बैठक
  • भाजप पदाधिका-यांच्या कामाचा घेणार आढावा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शह देण्यासाठी भाजपला तगड्या उमेदवाराची गरज भासत आहे. भाजपकडे प्रभावी उमेदवारांची कमतरता असल्याने भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू आहे. उद्या गुरूवारी (दि.17) भापजचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वतः शहरात येऊन शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शिरूरसाठी भाजपकडून आमदार लांडगे यांचे नाव घोषीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान खासदार आढळराव पाटील आणि आमदार लांडगे यांच्यात प्रतिष्ठेचा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावावर भाजपकडून जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. तसे संकेत पाठीमागे दानवे यांनी वाल्हेकरवाडीत पक्षाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा घेऊन आमदार जगतापांनी त्यांच्या बाजुने वातावरण तयार केले आहे. या सभेत जो खासदार, आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकनिष्ठ राहील, त्याचाच आगामी निवडणुकांसाठी विचार केला जाईल, असे बोलून मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे आमदारांना इशाराच दिला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढे यावे, असे संकेत देखील त्यांनी दिले. त्यामुळे लांडगे यांचे नाव तेव्हापासून चांगलेच चर्चेत आहे.

आमदार लांडगेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे उद्या शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिका-यांची बैठक होणार आहेत. या बैठकीसाठी जुन्नर, अंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भोसरीचे आमदार लांडगे आणि त्यांचे सुमारे चाळीस नगरसेवक तसेच त्या भागातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिरूरसाठी दानवे आमदार लांडगेंच्या नावाची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना शिरूरसाठी कधी एकदा दादांचे नाव घोषीत होते, याची उत्सुकता लागली आहे.

आढळराव-लांडगे संघर्ष अटळ?
शिरूर लोकसभेवर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे प्राबल्य आहे. हा गड आजमवण्यासाठी भाजपकडे प्रभावशाली उमेदवार नसल्याने पक्षाची घालमेल होत आहे. या मतदार संघात भाजपचे आमदार असले तरी खासदार आढळराव पाटील यांचे आव्हान घेण्याची क्षमता त्यांच्यात नसल्याने पक्षाकडून तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे ताकदवान उमेदवार म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाहिले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी लांडगे यांच्याबाबत यापूर्वीच संकेत दिले असताना उद्या दानवे स्वतः अधिकृरित्या लांडगे यांचे नाव स्पष्ट करतील, अशी आशा कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यामुळे आमदार लांडगे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यात राजकीय संघर्ष अटळ असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button