ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

“शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल” ः अभिनेता प्रसाद ओक

"महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळालाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे

मुंबईः महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात नीट शो मिळत नाहीत किंवा प्राइम टाइमसाठी झगडावं लागतं, हे सतत ऐकायला मिळत. आजवर या समस्येवर तोडगा निघालेला नाही. याच विषयी लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने भाष्य केलं आहे. शिवाय शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल, अशी आशा देखील व्यक्त केली आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी प्रसादला विचारलं की, मराठी चित्रपट हा हिंदी चित्रपटाशी स्पर्धा का करू शकत नाही? यावर अभिनेता म्हणाला, “स्पर्धा करत नाही असं काही नाही. माझ्याच चित्रपटांनी म्हणजे बाकीच्यांची पण मी उदाहरण देऊ शकेन. पण ‘हिरकणी’समोर चार हिंदी चित्रपट होते. ‘मेड इन चायना’ होता. ‘हाऊसफुल ४’ होता, ‘सांड की आंख’ होता आणि चौथा कोणता तरी होता. हे चारही चित्रपट पडले आणि ‘हिरकणी’ सुपरहिट चालला. ‘चंद्रमुखी’ २९ एप्रिल २०२२ला आला. ‘धर्मवीर’ १३ मे २०२२ला आला आणि २८ मे २०२२ला ‘हंबीरराव’ आला. लागोपाठ तीन मराठीतले सुपरहिट, मोठे चित्रपट आले. त्यांच्यासमोर एकही हिंदी चित्रपट चालला नाही. त्यामुळे स्पर्धा करत नाही, असं नाहीये.”

पुढे प्रसाद म्हणाला, “मुद्दा असा आहे, जे मराठीत छोटे चित्रपट आहेत, त्यांना चित्रपटगृह मिळताना खूप समस्या येत आहेत. ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. ज्याबद्दल वारंवार बोललं गेलेलं आहे. वारंवार याबद्दलची आंदोलन झाली आहेत. राज ठाकरे साहेबांनी खळखट्याक सारखं आंदोलन केलं आहे. वारंवार राज साहेबांसारखा नेता मराठी चित्रपटसृष्टीसाठी धावून आलेलाच आहे, हे मान्य केलंच पाहिजे. तरी सुद्धा वारंवार येणारं सरकार त्यावर ठोस पाऊल उचलत नाहीये, हे देखील तितकंच आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळालाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. याच्यासाठी भीक मागायची वेळ येता कामा नये. हे उघड सत्य आहे. पण या समस्येकडे ज्या सरकारच लक्ष जाईल आणि जे सरकार याच्यावरती तोडगा काढेल त्याच्यानंतरच काय ते होईल.”

“पण ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. त्यांना हिंदीमध्ये जास्त कलेक्शन मिळत म्हणून प्राइम टाइमचे शो हिंदी चित्रपटांना दिले जातात. हा त्यांचा माज आहे. एकेदिवशी कोणीतरी उतरवले, असं कोणतं तरी सरकार येईल. मी आशा करतो शिंदे सरकारच त्यांचा हा माज उतरवेल. काहींना काही तर तोडगा काढेल असं वाटतंय. माणसाने आशावादी राहावं. पण वारंवार जी भीक मागावी लागतेय शोसाठी मराठी चित्रपट निर्मात्यांना हे चित्र चांगलं नाही. हे वाईट आहे. हे बदललं पाहिजे एवढं नक्की,” असं स्पष्ट प्रसादने सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button