breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दहा टक्के पाणी कपातीसाठी आयुक्तांकडे पुन्हा प्रस्ताव

पुणे पाटबंधारे विभागाच्या स्मरणपत्रावर निर्णय होण्याची शक्यता

आयुक्त बोलविणार पदाधिकारी व विरोधी गटनेत्यांची बैठक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून मंजूर कोट्यापेक्षा अतिरिक्त पाणी उचलण्यात येवू नये, दुष्काळी पार्श्वभूमीवर शहरात तातडीने दहा टक्के पाणी कपात करुन त्यांची अमंलबजावणी करा, असे पत्र पुणे पाटबंधारे विभागाने पालिका पाणी पुरवठा विभागाला कळविले आहे. त्या पत्रावरुन पाणी पुरवठा विभागाने दहा टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डिकराकडे पाठविला असून त्यावर निर्णय घेण्यासाठी महापाैरांसह सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षाचे गटनेत्यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणी साठा जपून वापरण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरु असून दहा टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे.  

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून शहरासाठी 480 एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. मात्र, पुणे पाटबंधारे मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्मरण पत्र पाठवून 10 टक्के पाणी कपात करण्यास बजावले आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आलेल्या या पत्रानंतर अधिका-यांनी पाणी कपातीचे नियोजन सुरू केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांची बैठक बोलविण्याची विनंतीही महापौर राहूल जाधव यांच्याकडे केली आहे.

राज्यभरात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परस्थिती उदभवली आहे. पिंपरी-चिंचवडला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही कमी पाऊस झाला. परिणामी राज्यभरत पाणी बचतीचे धोरण आखण्यात आले. पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपात करण्य़ास पाटबंधारे विभागाकडून सुचित केले आहे. परंतु, विरोधकांच्या दबावापोटी सत्ताधारी पदाधिकारी पाणी कपातीचा निर्णय घेत नाहीत. तर, प्रशासन कपातीबाबत ठोस भूमिका मांडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

दरम्यान, शहरात पाणी कपात करण्याबाबत 20 ऑक्टोंबर 2018 रोजी महापालिकेला पत्र दिले होते. तरीही पाणी कपातीचा निर्णय झाला नाही. आता पुन्हा पाटबंधारे मंडळाने महापालिकेला 10 टक्के पाणीकपात करण्यास बजावले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका दररोज रावेत बंधा-यावरून पवना नदीतून 480 एमलडीहून अधिक पाणी उचलते. 10 टक्के कपातीप्रमाणे पालिकेने 40 एमएलडी कमी पाणी नदीतून उचलावे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता असल्याने पाणी वापर नियंत्रित करावा, असेही पाटबंधारे विभागाने सुचविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button