breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शास्ती कराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवडकरांची थट्टा

  • पाठीमागच्या सभेतील शास्ती कर माफीचा निर्णय ठरला खोटा
  • आता पुन्हा हा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – श्री मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवड नगरीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठीमागे पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावणारा शास्ती कर माफ केल्याची कबुली दिली होती. आता तेच मुख्यमंत्री शास्ती कराचा प्रलंबित प्रश्न येत्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. यावरून मुख्यमंत्र्यांचे पाठीमागील आश्वासन खोटे ठरले आहे. शास्तीसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडकरांची थट्टा करत असल्याचा सवाल त्यांच्या वक्तव्यावरून उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज बुधवारी (दि. 9) झाले. यावेळी महापौर राहूल जाधव, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, स्थायी समती सभापती ममता गायकवाड, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, क्रीडा सभापती संजय नेवाळे, शिक्षण सभापती सोनाली गव्हाणे, गटनेते कैलास बारणे, नगरसेविका अनुराधा गोरखे, आशा शेंडगे, नगरसेवक संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, नामदेव ढाके आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शास्ती कराच्या प्रश्नी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दररोज मला एक मेसेज पाठवतात. शास्तीची त्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्याचे मी देखील मनावर घेतले आहे. येत्या पंधरा दिवसांत शास्तीचा निर्णय मंत्रीमंडळात मी घेईन. शास्तीच्या संदर्भात सामान्य मानसाला दिलासा मिळाला पाहिजे. यातून अनधिकृत बांधकामाला समर्थन देतोय, अशी परिस्थिती येऊ नये, याची देखील काळजी घेतली जाईल. यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत यातही लक्ष घालण्याची गरज आहे. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी देखील साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मांडला आहे. त्यांनी अनेक निवेदने मला दिली आहेत. त्यासंदर्भातील फाईल्स प्राप्त झाल्या आहेत. त्यात कठीण नियम आहेत. ते दूर केले जातील, असेही फडणवीस म्हणाले.

मुळात मुख्यमंत्र्यांनी पाठीमागे चिंचवड गावातील सभेत शास्ती कराचा प्रश्न सुटला आहे, असा निर्णय घेतल्याची कबुली त्यांनी सभेत दिली होती. मात्र, त्यांनी पूर्वीचाच पूर्वलक्षी प्रभावाने शास्ती कर माफीचा निर्णय नागरिकांवर लादला. आता तेच मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडकरांना घुमजाव करत आहेत. जर, शास्ती कराचा प्रश्न सुटला असेल तर त्याची धास्ती घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न येत्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन का दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button