breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रगतशील समाज निर्माणासाठी प्रबोधनाची नितांत गरज – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी / महाईन्यूज 

प्रगतशील समाज निर्माण व्हावा याकरिता युवकांची भावना सकारात्मक होणे आवश्यक असून त्याकरिता प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. वारकरी संप्रदायाने किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ही समाज प्रबोधनाची चळवळ अखंड तेवत ठेवली आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

कोविड-१९ च्या संकटकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शहर पोलिस दलाने उत्कृष्टपणे आपली जबाबदारी पार पाडली. तसेच, कार्तिक मासामध्ये वारकरी मंडळांच्या वतीने आयोजिलेल्या विविध उपक्रमांना महापालिका आणि पोलीस दलाने विशेष सहकार्य केले. यामध्ये  पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते मानपत्र, शाल, पगडी, संत तुकाराम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी ग्रंथ, वीणा, मृदुंग, टाळ-चिपळ्या देऊन हा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये शहरातील विविध भजनी मंडळे आणि वारक-यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर आदींसह वारकरी  उपस्थित होते.

कोरोना काळामध्ये अध्यात्माचा जागर वारक-यांनी काकड आरती, भजन-पूजन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व शासकीय सूचना आणि नियमांचे पालन करून पार पाडला. पिंपरी-चिंचवड नगरी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे वास्तव्य करणारे वारकरी शहराचे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात, असे नमूद करून  महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, समाजातील अनिष्ठ चालीरिती नष्ट करण्यासाठी आणि समाजाला सन्मार्गावर नेण्यासाठी समाज प्रबोधनाचा महत्वपूर्ण वाटा आहे. वारकरी हे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहे. आजही महिलांना असुरक्षित वाटत असल्याने समाज प्रबोधनकारांनी नवोदित पिढीला मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे. पोलीस दलाने महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, असेही त्या म्हणाल्या.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, भक्तीची चिरंतर धारा संतांनी सुरु करून समाज प्रबोधन केले. प्रबोधनाचा मार्ग दाखवणारे संत समाजाचे पथदर्शक आहेत. ही परंपरा वारकरी संप्रदायाने जागृत ठेवली असून त्यांचे अनुशासन सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, नामाचा जागर अखंड ठेवल्यास रूप प्राप्ती होते. ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा सुरेख संगम साधून केलेली साधना चिरंतन टिकणारी आहे. वारक-यांमध्ये शेतक-यांचे प्रमाण अधिक आहे. आपली शेती ही आपली आई असून या काळ्या आईचा आशिर्वाद कायम पाठीशी असला पाहिजे. त्याकरिता जमीन न विकता तिचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे. वारक-यांनी माझा केलेला सन्मान हा माझ्यातील वारक-याचा वारसा जतन करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. समाजपयोगी अधिकाधिक प्रशासकीय कामे करण्यासाठी मी कटिबद्ध असून हा सत्कार मला सतत माझ्या कर्तव्याची जाणीव आणि प्रेरणा देत राहील.  

सत्कारार्थींची नावे :-

पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. कृष्णाजी रांजणे महाराज, जीवन मामा खाणेकर, महावीर महाराज सूर्यवंशी, चंद्रकांत महाराज वांजळे, संतोष महाराज पायगुडे, जालिंदर महाराज काळोखे, सतीश महाराज काळजे, विजुभाऊ भोंडवे, शिवानंद स्वामी, तुकाराम भाऊ, बबृवाहन महाराज वाघ, विनोद शेठ म्हाळुंगकर पाटील, युवराज शिंदे, विकास परदेशी, युवा उद्योजक केदार भेगडे, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे.

सत्कारार्थी भजनी मंडळांची नावे :-

विठ्ठल भजनी मंडळ (वरचीआळी दापोडी), हनुमान भजनी मंडळ (आकुर्डी), विठ्ठल भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ (पिंपळेगुरव), विठ्ठल रुक्मिणी पूजापाठ मंडळ (एच.ए.कॉलनी, पिंपरी), भोलेश्वर प्रतिष्ठान (चिंचवडेनगर, चिंचवड), वैष्णव विचार किर्तन संस्था (भोसरी), खंडोबा प्रतिष्ठान (निगडी).

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, ह,भ.प. कृष्णाजी रांजणे, चंद्रकांत वांजळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर यांनी तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक जयंत बागल यांनी केले. ह.भ.प.माऊली महाराज आढाव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप ह.भ.प. रामलिंग महाराज मोहिते यांनी पसायदानाने केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button