breaking-newsपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या गळतीचे लोण पिंपरी-चिंचवडमध्येही?

लांडेबनसोडेसाने यांच्याकडून शिवसेनेची चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळतीचे लोण पिंपरी-चिंचवड शहरातही येऊन पोहोचले आहे. माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने हे विधानसभेचे प्रबळ दावेदार शिवसेनेची चाचपणी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, राष्ट्रवादीने या शक्यतेचा इन्कार केला आहे.

बारामतीखालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय स्थिती अलीकडच्या काळात बदलली आहे. राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेल्यानंतर शहरात भाजपचे प्रस्थ वाढले. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना शहरातून घसघशीत मतदान झाले. विधानसभा निवडणुकीतही असाच कौल  कायम राहील, असे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी राष्ट्रवादीऐवजी महायुतीकडून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे. त्यात लांडे, बनसोडे आणि साने यांच्या नावाची चर्चा आहे.

महायुतीच्या जागावाटपात पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या आहेत. शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यात काही तथ्य नसून आपण राष्ट्रवादीकडून इच्छुक असून मुलाखतही दिल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.

भोसरी विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. तरीही दत्ता साने यांनी सेनेकडून चाचपणी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक त्यांनी लावले असून राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीला ते अनुपस्थित राहिले. विलास लांडे शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सातत्याने सुरू असते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने युती न झाल्यास शिवसेनेच्या उमेदवारीचा पर्याय ते तपासून पाहत असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात, लांडे, साने कोणतेही अधिकृत भाष्य करत नाहीत. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कोणीही नेता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विलास लांडे, अण्णा बनसोडे, दत्ता साने हे पक्षाचे निष्ठावंत आहेत. ते पक्षातच राहतील. राष्ट्रवादीला ते सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही.    – संजोग वाघेरे, पिंपरी शहराध्यक्षराष्ट्रवादी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button