राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर रिक्षाचालकांचे ‘जाणता राजा’ आंदोलन
पुणे – करोना व टाळेबंदीने हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. विविध मागण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आज रिक्षाचालकांनी अनोखे आंदोलन केले.
रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी सत्ताधारी पक्षांकडेच दाद मागण्याचा निर्णय रिक्षा पंचायतीने घेतला आहे. त्यानुसार प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयासमोर १५ ऑक्टोबर रोजी ‘अभंग दिंडी निदर्शन’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पुणे पक्ष कार्यालय, हिराबाग चौक, टिळक रस्ता येथे ‘जाणता राजा’ या अनोख्या निदर्शनाद्वारे प्रश्न मांडण्यात आले आहेत.
जाणता राजा छ.शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी आज्ञापत्रांचे वाचन करून कल्याणकारी शासन व्यवस्थेची आठवण यावेळी सत्ताधारी पक्षाला करून दिली. दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ हे लक्ष आवृत्ती भूषण पुस्तक व कल्याणकारी राज्याची मुद्रा देऊन त्यातून उलगडणार्या जाणत्या राजाप्रमाणे कारभार करावा, अशी मागणी केली आहे.