breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“संजय राऊत जे बोलतात त्यामुळे आमचं मनोरंजन होतं”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!

मुंबई |

देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेनं गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये ११ जागी उमेदवार उभे केले असून खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नुकतेच गोव्यात प्रचार करून परतले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय राऊतांनी वारंवार भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप कला जात असताना विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

  • “सकाळी एक बोलतात आणि संध्याकाळी…”

ईडी-सीबीआयच्या गैरवापराचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी फेटाळून लावत उलट महाराष्ट्र सरकारवरच आरोप केले आहेत. “संजय राऊत जे बोलतात, त्याने आमचं मनोरंजन होतं. कारण ते सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात. पण माझा सवाल आहे, की एखादं वक्तव्य केलं म्हणून नारायण राणेंना अटक करायची. जी घटनाच घडली नाही, त्यासाठी आशिष शेलारांवर खटला भरायचा, नितेश राणेंचं नाव गोवून त्यांना अटक करायची. फक्त मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या संदर्भात राबडीदेवी म्हटलं म्हणून २५-२५ पोलीस पाठवायचे, अटक करायची. हा यंत्रणांचा सदुपयोग आहे का?”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

  • “…मग ईडीची कारवाई चुकीची कशी म्हणता?”

“जर तक्रारी होत असतील, त्यात तथ्य आढळत असेल आणि त्यावर यंत्रणांनी कारवाई केली तर तो दुरुपयोग आहे का? अनिल देशमुखांबाबत जे खुलासे येत आहेत, ते पाहूनही तुम्ही ईडीची कारवाई चुकीची म्हणाल? अनिल देशमुख जे काही सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांबद्दल बोलत आहेत, त्यांच्याबद्दल ईडीनं शांत बसावं का? ही दुटप्पी भूमिका आहे. ईडीनं कोणतीही चुकीची कारवाई केली असेल, तर ती दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी न्यायालयातही जायला हवं. न्यायालय थांबवेल ते. आज या सरकारच्या माध्यमातून पोलिसांचा जो गैरवापर चालला आहे, अशा १०० घटना मी सांगू शकतो”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

  • “..तोच न्याय संजय राऊतांना का नाही?”

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीमध्ये आयुक्तांवर शाई फेकण्याच्या झालेल्या प्रकारावर तोंडसुख घेतलं. “अमरावतीमध्ये आयुक्तांवर शाई फेकणं चुकीचं आहे ते कुणीही केलं असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचा आम्ही निषेध करतो. पण त्याचवेळी जे रवी राणा तिथे नाहीत, त्यांच्यावर तुम्ही कोणत्या अधिकारात ३०७ कलम लावता? त्याच न्यायाने किरीट सोमय्यांवर जो हल्ला झाला, त्यासाठी रवी राणांचा न्याय संजय राऊतांना का नाही?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

  • “हे महाराष्ट्र बंगालच्या दिशेने नेतायत”

“गावोगावी आमच्या लोकांवर रोज खटले भरले जात आहेत. पोलीस एकतर्फी वागत आहेत. गोपीचंद पडळकरांना मारून टाकण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना एक बॉडीगार्ड द्यायला सरकार तयार नाही आणि हे एजन्सीच्या दुरुपयोगावर बोलतात. माझा सवाल आहे की महाराष्ट्रात लोकशाही तरी आहे का? हे महाराष्ट्र बंगालच्या दिशेने न्यायला लागले आहेत. बंगालमध्ये सरकारविरोधात बोललं की हातपाय तोडून टाकले जातात. किरीट सोमय्यांवर मोठा दगड टाकण्याचा प्रयत्न केला. नशीबानं ते वाचले. त्यामुळे मला वाटतं एजन्सीबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना नाही”, अशी टीका फडणवीसांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button