breaking-newsराष्ट्रिय

राममंदिरासाठीचे काम 50 टक्के पूर्ण

कारसेवकपुरममध्ये 1990 पासून सुरू आहे; काम निधी आणि कारागिरांच्या तुटवड्यामुळे काम थंडावले 

अयोध्या – अयोध्येत राम जन्मभूमी न्यासाच्यावतीने सुरू असलेल्या कारसेवकपुरम मधील कार्यशाळेत सुरू असलेले राम मंदिरासाठीचे काम सध्या थंडावले आहे. पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने आणि कारागिर आणि कलाकारांच्या कमतरतेमुळे या कामात खंड पडला आहे, असे या कार्यशाळेच्या प्रभारींनी सांगितले.

या कार्यशाळेमध्ये 1900 पासून मंदिरासाठीचे काम सुरू आहे. या कारसेवकपुरममध्ये प्रस्तावित राममंदिराची लाकडी प्रतिकृतीही एका काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आली आहे. देशभरातून येणारे हजारो भाविक ही प्रतिकृती औत्सुक्‍याने पहात असतात. अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक गाईडकडून कारसेवकपुरममधील ही कार्यशाळा आवर्जुन दाखवली जाते. या कार्यशाळेचे प्रभारी 72 वर्षीय अन्नू भाई सोमपुरा यांनी येथील दगड आणि तासलेल्या दगडांच्या राशी दाखवल्या. हे दगड लवकरच मंदिराच्या रचनेमध्ये सहज बसवता येऊ शकतील, असे तासले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेतील दगड फोडण्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यापर्यंत लागणारे दगड येथे तयार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या प्रकरणी अनुकूल निकाल लागणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास पायाभरणीच्या कामाला सुरुवात होईल, असे सोमपुरा यांनी सांगितले.  आराखड्यानुसार राममंदिर 268 फूट लांब, 140 फूट रुंद आणि 128 फूट उंच असणार आहे. मंदिरामध्ये एकूण 212 खांब असणार आहेत. मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर 106 खांब असतील. प्रत्येक खांबावर 16 मूर्त्या कोरलेल्या असतील. हे कोरीव काम कारागिरांनी पूर्ण केलेले आहे.

मंदिरासाठी दगड उपलब्ध होत आहेत. त्यावर कोरीव काम आणि मंदिराची उभारणी 4-5 वर्सात पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. मंदिराच्या पूर्वतयारीचे काम सध्या भाविकांच्या देणग्यांच्या आधारे सुरू होते. मात्र आता या देणग्या पूर्वीप्रमाणे मिळत नाहीत. सध्या कारसेवकपुरममधील कार्यशाळेत दोन कारागिर आणि दोन मजूर काम करत आहेत. काही जण काम सोडून गेल्याने ही संख्या कमी झाली आहे. 1990 साली येथे 150 जण काम करत होते. राज्यघटनेच्या चौकटीच्या आधीन राहून लवकरात लवकर राम मंदिराचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेशातील प्रवक्‍ते शरद शर्मा यांनी सांगितले. या कामाचा निवडणूकीशी काहीही संबंध नाही. हा बहुप्रतिक्षित विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button