breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान तातडीने पंचनामे करा : आमदार सुनील शेळके

  • मावळातील शेतकरी हवालदिल; दिलासा देण्याची मागणी
  • अतिवृष्टीसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आढावा बैठक

पिंपरी । प्रतिनिधी
मावळ तालुक्यात तीन-चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे खरीप पिकांचे विशेषतः भात पिकाचे मोठे नुकसान झाले. पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतजमिनीचेही नुकसान झाले. साधारण दोन हजार ६३४ शेतकऱ्यांच्या एक हजार १९१ हेक्टर क्षेत्रावरील भातासह इतर खरीप व बागायती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. यासाठी शासनाने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यात २२ ते २४ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आढावा बैठक शुक्रवार (दि.३०) पुणे येथे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील नुकसान झालेल्या परिस्थितीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे लक्ष वेधले.

आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे भात हे पारंपरिक पीक आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यातील अंदर मावळ, पवन मावळ, नाने मावळ या तीन विभागात भात शेतीचे प्रमाण जास्त आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह शेतात आला. पाणी साचून राहिले. भात जमिनीवर लोळला आहे. शेतकऱ्यांचे हातातील पीक वाया गेले. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणे आवश्यक आहे.अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे, अशी आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केले.

गृहमंत्र्यांकडून प्रशासनाला निर्देश
आमदार सुनील शेळके यांनी मांडलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्यात यावे. नुकसान झालेल्या जमिनी, फुटलेले बांध यांचे पंचनामे करून जमिनी पूर्ववत करण्यासाठी पडकई योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावी, परिसरात मनरेगा योजनेची कामे सुरु करावीत, दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास व कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button