breaking-newsमुंबई

राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत?

मुंबई – मुलगा सुजय विखे पाटील याच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मुलगा सुजयला अहमदनगर लोकसभेची जागा सोडण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीवर पुरेसा दबाव टाकला नाही त्यामुळे विखे पाटील पक्षावर नाराज आहेत. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यावरच ही परिस्थिती ओढावत असेल तर कार्यकर्त्यांची काय स्थिती असेल असे म्हणत विखेंनी पक्षनेतृत्त्वाकडे आपली नाराजी कळविल्याचे समजते.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सायंकाळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी दक्षिण अहमदनगरची जागा आपला मुलगा सुजयसाठी सोडण्यात यावी अशी विनंती केली. मात्र, आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याचे विखेंना सांगण्यात आले. त्यामुळे काँग्रेस पक्ष नगरची जागा आपल्या मुलाला देऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विखेंचा चांगलाच हिरमोड झाला. याबाबतची नाराजी त्यांनी पत्रकारांकडे उघड व्यक्त केली आहे.

नगर जिल्ह्यातील दोन जागांपैकी एक जागा काँग्रेसकडे आहे तर दुसरी जागा राष्ट्रवादीकडे. त्यामुळे दोन्ही पक्षाची ताकद समान राहण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीकडे राहण्याची गरज असल्याची भावना शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडकडे केल्याची माहिती आहे. शिवाय दक्षिण अहमदनगर भागातील राष्ट्रवादीचे असलेले आमदार, नगरसेवक व इतर सत्तास्थानांचीही माहिती पवारांनी काँग्रेस नेतृत्त्वाला दिली आहे. यासोबत विखे पाटील यांचा राजकीय इतिहासाची उजळणी पवारांनी केल्याचे समजते. त्यामुळे काग्रेस हायकमांडने सुजयसाठी जागा मागण्याचा विषय सोडून दिला.

मुलाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुजय वेगळा विचार करेल असे वक्तव्य विखेंनी केले होते. त्यानुसार सुजय विखे आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत आहेत. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील लवकरच विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button